सध्या रस्ता खडीकरण व मुरुमीकरणाचे मजबूत, उत्कृष्ट काम
जानेवारीपर्यंत डांबरीकरणाचे काम मार्गी लागणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी- मनवाड- नरेवाडी रस्त्याचे येत्या तीन महिन्यात डांबरीकरण करण्यात येणार आहे. जानेवारीपर्यंत डांबरीकरणाचे काम होणार असून यामुळे गडहिंग्लजशी जलद गतीने पोहोचण्यास हा मार्ग सोयीस्कर होणार आहे.
या रस्त्याचे अंतर किमान सहा किलोमीटर आहे. तेरणी- मनवाड रस्त्याकडे तेरणी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत होती. पावसाळ्यात रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल होत होता. त्यामुळे ये- जा करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत होते. या भागातील शेतकरी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 3 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात खडीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. सध्या या रस्त्याचे खडीकरण व मुरूमीकरण उत्कृष्टरित्या करण्यात आले आहे. मध्यंतरी पावसाळा व काही कारणास्तव कामात खंड पडला होता. येत्या तीन महिन्यात रस्ता डांबरीकरणाचे काम मार्गी लागण्यास मदत होणार असून तेरणी, मनवाड व नरेवाडी येथील नागरिकांना हा रस्ता सोयीचा होणार आहे.
रुंदीकरणासह खडीकरणाचे काम मजबूत व चांगल्या प्रकारे झाले आहे. जानेवारीपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा रहदारी करण्यास सोयीस्कर होणार आहे. या रस्त्यामुळे नरेवाडी, मनवाड यासह या परिसरातील गावांच्या नागरिकांना तेरणीवरून व्हाया हत्तरकी मार्गे पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग जवळचा होणार आहे. या परिसरातील शेतीमाल कोल्हापूर, बेळगाव बाजारपेठेत जलद गतीने पोहोचण्यास या रस्त्यामुळे मोठी मदत होणार आहे. तसेच तेरणी, कळविकट्टे येथील नागरिकांना गडहिंग्लजशी संपर्क साधण्यासाठी जवळचा मार्ग झाला आहे.