Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटित होणार

5 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे "लढा परिषद" 

लढा परिषद यशस्वी करण्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी संकेश्वर ते आंबोली "टू व्हीलर रॅली" 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
 संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्गात बाधित शेतकरी आजरा व गडहिंग्लज  तालुक्यातून मोठ्या प्रमाणात एकत्रित येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते  व संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून धडपडत असल्याचे दिसत आहे. आमचा विकासाला विरोध नाही मात्र बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा ही भूमिका शेतकऱ्यांची असल्याचे कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी सांगितले.

संकेश्वर- बांदा महामार्गासाठी सध्या झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. या मार्गात बाधित असणारे आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्रित येत असल्याचे दिसत आहे. विकास कामाला या शेतकऱ्यांचा विरोध अजिबात नाही मात्र हे करत असताना बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा हीच अपेक्षा बाधित शेतकऱ्यांची आहे. याकडे  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मध्यंतरी आंदोलनही करण्यात आले आहे.

आता पुन्हा दिनांक 5 नोव्हेंबर रोजी जागृती हायस्कूल जवळील श्रीराम मंदिर गडहिंग्लज येथे दुपारी दोन वाजता भव्य लढा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या लढा परिषदेला शेतकरी सभेचे राज्य संघटक भाई दिगंबर कांबळे, माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, धरणग्रस्तांचे राज्य संघटक कॉम्रेड धनाजी गुरव, ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, महामार्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, धरणग्रस्त नेते कॉम्रेड अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित राहून या लढा परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, ही लढा परिषद यशस्वी करण्यासाठी रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी संकेश्वर ते आंबोली "टू व्हीलर रॅली" काढण्यात येणार आहे. ही लढा परिषद यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड शिवाजी गुरव बाधित गावातील शेतकऱ्यांना संघटित करून जनजागृती करत आहेत.

बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

या महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला राष्ट्रीय महामार्ग लगतचा दर धरून कमीत कमी एकरी दीड कोटी किंवा बाजारभावाच्या दहापट मोबदला द्यावा, महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मोबदला मिळण्याची निवाडा नोटीस वहिवाटीप्रमाणे देण्यात यावी, महामार्ग बाधित प्रत्येक गावातील बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत बाधित गावच्या हद्दीत कसलेही महामार्गाचे काम करू नये, महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फळझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, घरे, हॉटेल, दुकान, बांधकाम, पत्राशेड, जनावरांचा गोठा या सर्वांचे योग्य मूल्यांकन करून चारपट मोबदला देण्यात यावा, नवीन हायवे  करत असताना जिथे जिथे जिल्हा मार्ग, राज्य मार्ग क्रॉस होतात तिथे हायवेवर प्रवेश करण्यासाठी तरतूद करण्यात यावी, या महामार्ग कामामध्ये सुरुवातीपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात यावा,  शेतकऱ्यांच्या सहमती व हक्कासाठी 2013 च्या भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, बाधित शेतकऱ्यांच्या फळबाग, बांधकाम, घरे, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन या सर्वांचा सर्वे पंचनामा करताना त्या गावातील शेतकऱ्यांना अगोदर चार दिवस सूचना करून जे. एम. सी करण्यासाठी एकत्रित कमिटी यावी, सदरचा नियोजित महामार्ग गडहिंग्लज व आजरा या शहरातून न जाता बायपास रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, भविष्यात या दोन शहरांमध्ये वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे. सद्यस्थितीला  या दोन शहरांमध्ये वाहतूक कोंडी होत असते याचाही विचार व्हायला हवा. आदी मागण्यांकडे या लढा परिषदेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटित होण्यास प्रारंभ झाला असून दिनांक 5 नोव्हेंबरच्या लढा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.