शोकाकुल वातावरणात वडरगे येथे अंत्यसंस्कार
गडहिंग्लज(प्रतिनिधी): उत्तर प्रदेश मधील झाशी येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना बुधवारी वडरगे येथील जवान दीपक गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. तब्बल तीन दिवसानंतर त्यांचे पार्थिव आज (शनिवार ) सकाळी वडरगे येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील माजी सैनिक दिनकर गायकवाड यांनी भडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. सैन्याच्या वतीने गायकवाड कुटुंबाकडे ध्वज प्रदान करण्यात आला.
सकाळी जवान दीपक गायकवाड यांचे पार्थिव पुण्याहून खास वाहनाने वडरगे येथे आणण्यात आले. पार्थिव गावात आणल्यानंतर सर्वप्रथम जवान गायकवाड यांच्या घरी नेण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत ग्रामस्थांसह तालुक्यातून आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा व घरासमोर ग्रामस्थांनी रांगोळी काढून जवान दीपक गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली होती.
वडरगे गावच्या माळावरील गावठाण हद्दीत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी पार्थिव आल्यानंतर काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
यावेळी नायब सुभेदार दिलीप राठोड, सुजित इंजल, शहाजी पाटील, रवी सिंह, एम.जी.भारद्वाज, आमदार हसन मुश्रीफ, माजी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी अशोक पवार, माजी जि.प सदस्या अनिता चौगुले, माजी पं. स.सदस्य विठ्ठल पाटील, वसंतराव यमगेकर, प्रकाश पताडे, सरपंच संजय बटकडली, मुख्याध्यापक विलास माळी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे,
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
नायब तहसीलदार व्ही.एन.बुट्टे, मुख्याध्यापक विलास माळी, जय जवान जय किसान संघटनेचे माजी सैनिक कुमार पाटील यांच्यासह आजी- माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जवान दीपक गायकवाड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
गायकवाड कुटुंबीयांनी घेतला विधवा प्रथा बंदीचा निर्णय
जवान दीपक गायकवाड यांच्या निधनाचे दुःख पेलत गायकवाड कुटुंबीयांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. दुःखात असतानाही गायकवाड कुटुंबीयांनी घेतलेल्या या विधायक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.