हुक्केरी(वार्ताहर): श्रीनगर येथे लष्करी सेवेत कर्तव्य बजावत असताना बडकुंद्री (ता. हुक्केरी) येथील जवान शिवानंद बाबू शिरगावे (वय 42) यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. ते श्रीनगर येथील 55 आर आर बटालियनमध्ये कार्यरत होते. दरम्यान, आज त्यांच्या पार्थिवावर बडकुंद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्थिव बडकुंद्री गावातील सरकारी शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राज्य सरकारच्या वतीने हुक्केरी तालुका दंडाधिकारी डॉ. डी. एच. उगार यांच्या उपस्थितीत पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, माजी मंत्री शशिकांत नाईक, बेळगाव डी ए आर पोलीस वरिष्ठाधिकारी काशप्पण्णावर, यमकनमर्डी पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ आदींनी अंतिम दर्शन घेतले. जवान शिवानंद शिरगावी यांच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर बडकुंद्री गावात स्वयंघोषित बंद पुकारण्यात आला होता. सर्व व्यवहार बंद करुन ग्रामस्थांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला.
जवान शिवानंद शिरगावी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.