Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सहज योगाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवा : प्रा. रवींद्र गावकर

शिवराज महाविद्यालयात योग कार्यशाळा  


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
योगाच्या माध्यमातून आपण आपले जीवन आनंदी व समृद्धी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. योग आणि ध्यानधारणा आपल्या सुखी व आनंदी जीवनासाठी महत्त्वाचा आहे. चांगल्या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्याकडे जे उदंड आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. यातून मिळणारा आनंद आपल्या जीवनासाठी खूप आहे. सतत केलेल्या ध्यानधारणेतून आपल्यातील एकाग्रता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन सहज योगा मेडिटेशन पुणेचे प्रा. रवींद्र गावकर यांनी केले.

गडहिंग्‍लज येथील शिवराज महाविद्यालय, प्रज्ञा परिसर प्रकल्प व सहज योगा मेडिटेशन पुणे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय योग कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले.

प्रा. गावकर पुढे म्हणाले, शिक्षक आपणास शिकवत आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावे. आपणा सर्वांना शांततेचा वारसा लाभलेला आहे त्याचा योग्य वापर करून आयुष्यात खूप प्रगती करण्यासाठी आपल्यातील वाईट गोष्टी काढण्यासाठी सहज योगाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्यातील कल्पकता बाहेर येणे गरजेचे आहे. आपण ज्ञानातून पारंगत होणे आवश्यक आहे. यातून आपले व्यक्तिमत्व सुधारले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहज योगाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.

प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, पूर्वजांनी दिलेली योगविद्या ही अमूल्य देणगी आहे. आपल्या देशाने ही विद्या संपूर्ण जगाला दिली आहे. अशी योगविद्या ही अनुभवातून वाढते, ती आत्मसात करावी आणि आपले जीवन समृद्ध बनवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, सहज योगा मेडिटेशनचे विजय सोमवंशी, सागर अक्कावार, विनोद तिगुळकर, चंद्रकांत म्हात्रे, मंगेश शिक्रे, प्रिया कातोरे, गौरी गावडे, शेखर कांबळी,आप्पा कापडी, दाजी सावंत, पूजा परब, आनंद हरमलकर, प्रसाद नेसरकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.अल्ताफ नाईकवाडे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.