आजरा (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने आजरा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवत, संजय घाटगे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर ते आंबोली हा मार्ग आता महामार्ग होणार असल्याचे समजते. याबाबतचा पहिला टप्पा म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडली जात आहेत. शेतकऱ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. जमीन संपादन केल्याशिवाय खासगी जमिनीत कोणत्याही प्रकारचे काम करू देणार नाही, जमीन संपादनासाठी रीतसर नोटीस काढावी,
प्रत्येक शेतकऱ्याला त्याची एकूण किती जमीन रस्त्यासाठी संपादन करणार याबाबत स्पष्टता पाहिजे व तशी नोटीस त्याला मिळाली पाहिजे, बाधित शेतकऱ्यांना मोबदला देत असताना 2013ची भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत महामार्गाचे कोणतेही काम शेतकऱ्यांच्या हद्दीत करू नये, बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देत असताना हायवेलगतचा रेडीरेकनरचा दर धरण्यात यावा, निवाड्याची एक प्रत संघटनेला मिळावी, हॉटेल, राहती घरे, दुकाने यांनाही नोटिसा काढून व बाजारभावाप्रमाणे किमती करून नुकसान भरपाई द्यावी, सदरच्या सर्व जमिनी संपादन करणारा अधिकारी कोण आहे हे जाहीर करावे, तक्रार करायची असेल तर कोणाकडे तक्रार करावी हे संबंधित शेतकऱ्याला माहीत असले पाहिजे, संपादन अधिकारी कोठे व कधी भेटणार त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदीनुसार शेतकऱ्याची मालकी आहे. त्यामध्ये येणारे दोन्ही साईडपट्टीची झाडे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संकेश्वर बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.
या मोर्चात शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवत, संजय घाटगे, निवृत्ती कांबळे, बाबासो देसाई, गणपतराव यसणे, गणपतराव डोंगरे, विमल थोरवतकर, कांचन बेळगुंदकर, पांडुरंग पोवार, वसंत जाधव, हरिभाऊ मोहिते, राजाराम पाटील, सदाशिव चोरगे सहभागी झाले होते.