सौ.सीमा पाटील, सौ.प्रेमा कदम, सौ.नम्रता पोवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
सिंबायोसिस स्कूल, हरळी येथे उद्या (शुक्रवार) पुरस्कार वितरण सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व आदिती फौंडेशन नंदनवाड यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सिंबायोसिस स्कूल हरळी येथे संपन्न होत आहे. यावेळी तालुक्यातील सौ.सीमा पाटील, सौ.प्रेमा कदम, सौ.नम्रता पोवार यांना तालुका पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत, गटविकास अधिकारी शरद मगर व आदिती फौंडेशनचे अध्यक्ष दिनकर सावेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तालुक्यातील शिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी फाउंडेशनने पंचायत समितीला दिलेल्या ठेवीच्या व्याजातून हा समारंभ पार पाडला जातो. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांचे 'शिक्षणात पालक व शिक्षकाची भूमिका' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास फौंडेशनचे सचिव आनंदा वाघराळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, विस्ताराधिकारी रमेश कोरवी, प्राचार्य संभाजी कार्वेकर उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिक्षणप्रेमी, पालक व शिक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आदिती फौंडेशन व गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले आहे.