गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू
6 नोव्हेंबरला होणार मतदान
राजकीय हालचाली पुन्हा वेगावल्या
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची थांबलेली पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया स्थगिती उठवल्याने पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 6 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 15 जुलैला कारखाना निवडणूक स्थगित झाली होती. त्यामुळे राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता "गोड साखर" निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजल्याने ऐन दिवाळीत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.
19 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी छाननी होणार असून 27 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची तारीख आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच शासनाने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबर पर्यंत स्थगिती दिली होती. यामुळे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. शासनाने स्थगिती उठविल्याने पुन्हा एकदा निवडणूक सुरू झाली आहे. साखर कारखान्यावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सध्या या कारखान्यात 24 हजार 851 सभासद संख्या असून 240 संस्था सभासद आहेत. सध्या कारखान्यावर प्रशासक मंडळ आहे.
निवडणूक कार्यक्रम असा : छाननी 11 ऑक्टोबर, माघार 12 ते 27 ऑक्टोबर, चिन्ह वाटप 28 ऑक्टोबर, मतदान 6 नोव्हेंबर, मतमोजणी 8 नोव्हेंबर