पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 ऑक्टोबरला नवी दिल्लीत 'पीएम किसान संमेलन-2022" चे होणार उदघाटन
नवी दिल्ली ( सौजन्य: पीआयबी ): पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत मेला ग्राऊंड, आयएआरआय, पुसा इथे “पीएम किसान सन्मान संमेलन-2022’ चे उदघाटन करतील. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सरकारची पथदर्शी योजना, पीएम-किसान अंतर्गत शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मदतीचा 12 वा हप्ता म्हणून 16 हजार कोटी रुपये निधी वितरित केला जाईल. यावेळी पंतप्रधान कृषी स्टार्ट अप आणि प्रदर्शनाचे तसेच केंद्रीय रसायने आणि खाते मंत्रालयाच्या 600 पीएम किसान समृद्धी केंद्रांचे आणि भारत युरिया बॅग्स, या शेतकऱ्यांसाठी खते क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या - एक देश- एक खत योजनेचा शुभारंभ करतील.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. “पीएम किसान सन्मान संमेलन 2022” चे आयोजन कृषी आणि रसायने तसेच खते मंत्रालयाने संयुक्तरित्या केले असून पंतप्रधान मोदी यावेळी कोट्यवधी शेतकऱ्यांना, कृषी स्टार्ट अप्स कंपन्यांना, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर हितसबंधीयांना मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात, शेतकरी आणि स्टार्ट अप कंपन्या एकाच मंचावर येतील. एक कोटींपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होतील. 732 कृषी विज्ञान केंद्रे (KVK), 75 आयसीएआर संस्था, 75 राज्य कृषी विद्यापीठे, 600 पीएम किसान केंद्र, 50,000 प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि 2 लाख समुदाय सेवा केंद्रे (CSCs) देखील या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित राहतील.
केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा आणि कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि शोभा करंदलाजे उदघाटन समारंभात सहभागी होतील.
यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी सन्मान निधीचा 16,000 रुपयांचा 12 वा हप्ता जारी करतील. सरकारच्या या पथदर्शी योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना 2000 रुपयांचे तीन हप्ते असा वार्षिक 6000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. आजपर्यंत पात्र शेतकऱ्यांना पीएम - किसान योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळाला आहे. कृषी क्षेत्राच्या एकात्मिक आणि भरीव प्रगतीसाठी, अनेक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेण्याच्या, पंतप्रधानांच्या कटिबद्धतेचे ही योजना म्हणजे मूर्त स्वरुप आहे.
कृषी स्टार्ट अप परिषद आणि प्रदर्शनाचे उदघाटन
या प्रसंगी पंतप्रधान कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. जवळपास 300 स्टार्टअप्स अचूक शेती, कापणी नंतरची काळजी आणि मूल्यवर्धन उपाययोजना, कृषी संलग्न व्यवसाय, कचऱ्यातून संपत्ती, लहान शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी लॉजिस्टिक व्यवस्था आणि आपले इतर नवोन्मेष या प्रदर्शनात मांडतील. सुमारे 1500 कंपन्या ह्या प्रदर्शनात सहभागी होतील.
600 पीएम किसान किसान समृद्धी केंद्रांचा शुभारंभ
पंतप्रधानांच्या हस्ते रसायने आणि खते मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत, 600 पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांचे उदघाटन होईल. सध्या देशांत सुमारे 2.7 लाखांहून अधिक किरकोळ खते विक्री केंद्रे आहेत. गावे, उपजिल्हा, उपविभाग, तालुका आणि जिल्हा स्तरावर ही केंद्रे आहेत. यांचे व्यवस्थापन कंपन्या, सहकारी दुकाने किंवा खाजगी किरकोळ विक्रेते करतात. मात्र आता देशातील खतांची किरकोळ विक्री करणारी दुकाने टप्प्याटप्प्याने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांत रूपांतरित केली जातील. या केंद्रांतून शेतकऱ्यांच्या विविध गरजा भागवल्या जातील आणि शेतीला लागणारी सामुग्री (खते, बियाणे, उपकरणे), मृदा चाचणी सुविधा पुरवल्या जातील.
एक देश- एक खत योजनेअंतर्गत उपक्रमाचा शुभारंभ
या कार्यक्रमात पंतप्रधान‘भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प - एक देश एक खत’(ONOF) योजनेचेही उदघाटन करतील. या योजनेअंतर्गत पंतप्रधान भारत युरिया बॅग्सची सुरवात करतील. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातल्या सर्व खत कंपन्यांना त्यांच्या खतांचे विपणन ‘भारत’ या ब्रॅन्डनेमने करणे अनिवार्य करणार आहे. यामुळे देशभरात खतांची निर्मिती करणारी कंपनी कोणतीही असो तिचे एकच प्रमाणित उत्पादन ‘भारत’ ह्या ब्रॅंडनेमखाली विकले जाईल.
साप्ताहिक आंतरराष्ट्रीय ई-पुस्तिकेचे प्रकाशन
या कार्यक्रमात, पंतप्रधान ‘इंडियन ईगल’ या खत विषयक ई – साप्ताहिकाचे प्रकाशन करतील. यातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खते आणि या क्षेत्रातील इतर घडामोडींची माहिती मिळेल, इतर मुद्द्यांसोबतच अलीकडच्या घडामोडी, किंमत विषयक कल, उपलब्धता आणि वापर, शेतकऱ्यांच्या यशोगाथा याविषयी माहिती असेल.