![]() |
(छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना वाचनातून आपले आयुष्य समृद्ध करण्याची मोठी संधी आहे. लेखकांनी लिहिलेल्या साहित्यातून त्यांनी अनुभवलेले व पाहिलेले भावविश्व उमटलेले असते, ते डोळसपणे वाचन करून त्यांच्या लेखनाशी समरस होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार किरण गुरव यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय, वाड्मय मंडळ व सर्व भाषा विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित "लेखक तुमच्या भेटीला" या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम. कदम होते.
यावेळी वाचकांशी मुक्त संवाद साधताना किरण गुरव पुढे म्हणाले, लेखकांनी लिहिलेल्या साहित्याशी एकरूप झाले पाहिजे तरच आपल्या वाचनाला अर्थ प्राप्त होतो. त्यासाठी आपण पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे.
लेखकांनी लिहिलेल्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी ऊर्जा व प्रेरणा घ्यावी. यावेळी त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली आहे तर आपण कथेमध्ये रमलो असल्याचे सांगितले.
आपण लिहिलेल्या "जुगाड" मधून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन करिअर करू पाहणाऱ्या नायकाची जीवनासाठी चाललेली धडपड व त्याची औद्योगिक विश्वातील व्यवस्थेत होणारी घुसमट प्रामुख्याने मांडले असल्याचे सांगून आपला संपूर्ण लेखनपट त्यांनी उलगडला. आपण जे जे पाहिले, अनुभवले ते ते आपल्या साहित्यविश्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आजच्या आधुनिकतेमध्ये तंत्रज्ञानाने पुस्तके तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. वाचकांनी ते डोळसपणे वाचले पाहिजे असे आवाहनही विद्यार्थ्यांना त्यांनी केले. यावेळी त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी वाचनप्रिय झाले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्याचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
वाचनातून आपले व्यक्तिमत्त्व सुधारते असे सांगून वाचनाची किमया काय आहे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उत्कृष्ट वाचक शिक्षक डॉ. एन. आर.कोल्हापुरे, डॉ. पी.एल. यमगेकर, प्रा. लोहीता माने, उत्कृष्ट वाचक विद्यार्थी सचिन रामा मगदूम, अमन उर्फ जुनेद सिकंदर पटेल, कु. तेजस्विनी अनिल पाटील, उत्कृष्ट वाचक सौ. विशाखा अविनाश जोशी, गोपाल वासुदेव सबनीस यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सुरुवातीला कनिष्ठ विभागामार्फत मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर बनवलेल्या भित्तीपत्रकाचे उदघाटन कथाकार किरण गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.आशोक मोरमारे यांनी केले. आभार प्रा. डी. यु. जाधव यांनी मानले.