कॉ. शिवाजी गुरव यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन
माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनाही निवेदन देत अपंग बांधवांच्या समस्येकडे वेधले लक्ष
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात अपंग बांधवांसाठी कॅम्प घेण्याची मागणी
![]() |
माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांना अपंग बांधवांच्या समस्येबाबत निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दलालांमुळे अपंग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चिरीमिरी घेऊन स्मार्ट कार्ड देण्यात येत असून यामुळे अपंग बांधवांची फसवणूक होत आहे. अपंग बांधवांची अशाप्रकारे पिळवणूक करणाऱ्यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरदाळ (तालुका आजरा) येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव यांनी सीपीआर हॉस्पिटलच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. दरम्यान, सदर निवेदन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांना येथील एका कार्यक्रमादरम्यान देत अपंग बांधवांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, अपंग व्यक्तींना त्यांचे जुने सर्टिफिकेट जमा करून नवीन स्मार्ट कार्ड दिले जात आहे. नवीन अपंगत्व प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या व्यक्तींना देखील अशा प्रकारचे कार्ड दिले जाते. परंतु या प्रक्रियेत चिरीमिरी घेऊन काम करत असल्याचे दिसते. आजरा, गडहिंग्लज, चंदगड भागातील लोकांना पूर्वीच्या 80 टक्के किंवा 70 टक्के असलेले प्रमाणपत्र जमा करून 40 टक्के दिले जात आहे. मात्र यासाठी चिरीमिरी दिल्यास जास्त टक्केवारी दिली जाते. याची त्वरित चौकशी करावी व संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
तसेच अपंग बांधवांच्या मागणीप्रमाणे गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात कॅम्प घेण्यात यावेत. कॅम्प घेण्याबाबत आंदोलन केले होते. तरीसुद्धा यासंदर्भात नियोजन करण्यात आलेले नाही. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात अपंगांसाठी कॅम्प घेऊन त्यांना सीपीआरमध्ये होणाऱ्या या त्रासातून मुक्त करावे. जुनी प्रमाणपत्रे कोणतीही तपासणी न करता रद्द केली जात आहेत. सदर ठिकाणी काही दलाल अपंग व्यक्तींकडून पैसे घेऊन कार्ड देत आहेत. मात्र यामुळे अपंग असूनही केवळ पैसे न दिल्यामुळे हे प्रमाणपत्र नाकारले जात आहे. किंवा त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी आहे त्यापेक्षा कमी दिली जात आहे. अशा अपंगाना पूर्वीप्रमाणे टक्केवारी दुरुस्ती करून यूडीआयडी कार्ड देण्यात यावेत, अपंग बांधवांना होणारा नाहक त्रास कमी होण्यासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यातून एकदा अपंग तपासणी व कार्ड वितरीत करण्यासाठी कॅम्प घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार हसन मुश्रीफ यांनाही देण्यात आले आहे.