Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशातल्या पहिल्या हिंदी भाषेतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा भोपाळ येथे शुभारंभ

अभियांत्रिकीचे शिक्षण देखील लवकरच हिंदी भाषेत सुरू होणार 


नवी दिल्ली ( सौजन्य: पीआयबी ):
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे देशातल्या पहिल्या हिंदी भाषेतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वैद्यकीय क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि आगामी काळात तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हा दिवस देशाच्या शिक्षण क्षेत्राच्या पुनर्जागृतीचा आणि पुनर्निर्मितीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला महत्त्व देऊन अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम, गुजराती, बंगाली यासारख्या प्रादेशिक भाषांमध्ये देण्याचं आवाहन केले होते, आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालचे मध्यप्रदेश सरकार मोदी यांची इच्छा पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य ठरल्याचे ते म्हणाले. 

ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण हिंदीमध्ये सुरु होत असून लवकरच अभियांत्रिकीचे शिक्षण देखील हिंदी भाषेत घेता येईल. तसेच देशभरातील आठ भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या पुस्तकांचे भाषांतर सुरू झाले आहे आणि लवकरच देशभरातील विद्यार्थी तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून घेऊ शकतील असे अमित शाह म्हणाले. आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण यापुढे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणामधील सूचना त्यांच्या मातृभाषेत मिळणार नाहीत, तर ते आपल्या भाषेत संशोधनही करू शकतील. असे शाह यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे मध्यप्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे धोरण ते इथे राबवत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की मातृभाषेत विचार प्रक्रिया उत्तम प्रकारे होते आणि मातृभाषेतील शब्द हृदयाला भिडतात. विचार, विचारांची उजळणी, संशोधन, तर्क, विश्लेषण आणि निर्णय या सर्व क्रिया मन मातृभाषेतूनच करतं.   जर मातृभाषेतून अभ्यास आणि संशोधन केलं गेलं, तर भारतीय विद्यार्थी इतर देशांतील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही कमी पडणार नाहीत आणि ते संशोधनात भारताचा नावलौकिक वाढवतील असही त्यांनी सांगितले.

 एकविसाव्या शतकात काही शक्तींनी ब्रेन ड्रेन थिअरी म्हणजे (भारतातून बुद्धिमंतांचा ओघ परदेशात जाण्याची प्रक्रिया) स्वीकारली आणि आज पंतप्रधान मोदी या सिद्धांताचं ब्रेन गेन (बुद्धिमंत भारतातच राहण्याच्या) थिअरीमध्ये रूपांतर करत आहेत.  आज मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक धोरणाने आपल्या भारतीय भाषांना महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देशातील 12 भाषांमध्ये JEE, NEET आणि UGC परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.

स्वतःच्या भाषेत अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमतांमध्ये नक्कीच वाढ होईल. विद्यार्थ्यांनी आपला मातृभाषेविषयीचा न्यूनगंड सोडावा,  कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि विद्यार्थी निश्चिंतपणे आपापल्या मातृभाषेतून त्यांची क्षमता दाखवू शकतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात अनेक बदल केले आहेत. त्यांनी सांगितलं की 2014 मध्ये 387 वैद्यकीय महाविद्यालये होती आणि आता ही संख्या वाढून 596 झाली आहे. एमएमबीएसच्या जागांची संख्या 51 हजार वरून 79 हजार झाली आहे.  आयआयटीच्या 16 संस्था होत्या आता 23 आहेत,  आयआयएमच्या 13 संस्था होत्या आता 20 आहेत आणि आयआयआयटीच्या  (ट्रिपल आयटी) 9 संस्था होत्या आता 25 आहेत. 2014 मध्ये देशात 723 विद्यापीठ होती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यांची संख्या 1 हजार 43 पर्यंत वाढवल्याचे केंद्रीय मंत्री शहा यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.