Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा रस्ता रुंदीकरणात अडथळा न ठरणाऱ्या दुर्मिळ वृक्षांची तोड करू नये

पर्यावरण प्रेमींची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना निवेदन

गडहिंग्लज, आजरा परिसरातील पर्यावरण प्रेमी व तज्ञ लोकांसाठी विकासक कंपनी सोबत खुला संवाद कार्यक्रम आयोजित करा 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
संकेश्वर- बांदा रस्ता रुंदीकरण कामात अडथळा न ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्यात येऊ नये अशी मागणी पर्यावरण प्रेमी अनंत पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा रस्ता रुंदीकरण कामास सुरुवात झाली आहे. सदर मार्ग पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील व अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्रातून जात आहे. या मार्गावर पूर्वी इंग्रज सरकारने रोपण केलेली दुर्मिळ स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. यातील अनेक वृक्ष हे गेली दोनशे वर्षापासून उभे आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी यातील अनेक वृक्षांचा बळी जात आहे. यामध्ये काही वृक्ष गरज नसतानाही कापली जाणार आहेत.

गरज नसणाऱ्या  व रुंदीकरणास अडथळा न ठरणाऱ्या जुन्या वृक्षांची कत्तल  करू नये, जुने झाड पूर्णपणे न मारता संबंधित ग्रामपंचायती कडून जागा उपलब्ध करून त्याच गावात त्याचे पुनर्रोपण करावे, नवीन रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या कडेला निरुपयोगी शोभेची झाडे न लावता स्थानिक देशी वृक्षांचे व वनस्पतींचे रोपण करावे, सदर वृक्ष हटविणे व नवीन लागवडी संदर्भातील तज्ञ अहवाल, परवानग्या व नियोजन माहितीसाठी उपलब्ध व्हावा तसेच गडहिंग्लज, आजरा परिसरातील पर्यावरण प्रेमी व तज्ञ लोकांसाठी विकासक कंपनी सोबत खुला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर अनंत पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, अक्षय पाटील- गिजवणेकर आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.