'कोजागिरी'च्या शीतल चांदण्यात गडहिंग्लजमध्ये बहरली "रंग सुरांची मैफिल"
(छाया : मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालय व अमन युथ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित "रंग सुरांचे" या बहारदार कार्यक्रमात पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात मन मोहून टाकणारी बहारदार गाणी तसेच कॉकटेल गीतांची नजाकत, डान्सचा जलवा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत कोजागिरीच्या शीतल चांदण्यात बहरली. कोजागिरी निमित्त गडहिंग्लजच्या रसिकप्रेक्षकांना यानिमित्ताने बहारदार गाण्यांची मेजवानीच मिळाली.
सपना सावंत यांनी गायलेल्या 'तेरे संग प्यार नही छोडना' व गीता तेरणीकर यांनी 'अधिर मन झाले' या गीतांमधून कार्यक्रमाची रंगत वाढवली. दीपक कोळकी व गीता तेरणीकर यांनी 'अश्विनी ये ना.. व इंद्रजीत बनसोडे यांनी गायलेल्या 'तुम दिल की धडकन' या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. हे बहारदार गीत सादर करून रसिकांची दाद मिळविली.
तसेच 'सखी मंद झाल्या तारका' या बाबुजींच्या गीतांची सुरेलता आणली. सादिक लमतुरे, युनूस नायकवडी, हबीब मकानदार, सलीम खलिफ यांनी मराठी हिंदी गीतांनी रसिकांची दाद मिळवली. शर्व मगदूमच्या नृत्याविष्काराची झलक "वन्स मोअर"ची दाद मिळविली.
या कार्यक्रमात रंगमंचाचे पूजन माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुश्रीफ यांनी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून रंग सुरांची पर्वणी उपलब्ध करून विद्यार्थी व कलाकारांना प्रोत्साहन देत आहे. अशा कार्यक्रमातून कलाकारांच्या कलेला संधी देऊन कोजागिरी साजरी केली जात आहे. शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या या सांस्कृतिक परंपरेची पर्वणी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करून अशा या बहारदार कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू सांगितला. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून माजी प्राचार्य कै.खिचडी यांची सांस्कृतिक परंपरा जपत आहोत. त्यांच्या सांस्कृतिक कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही असे सांस्कृतिक उपक्रम राबवून या भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून संधी देत आहोत असे सांगितले.
यावेळी कोरिओग्राफर विद्यार्थी शर्व मगदूम, अमन युथ सर्कलचे सादिक लमतुरे युनुस नायकवडी, हबीब मकानदार, सलीम खलिफ व अन्य कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम, प्रा. सौ.बिनादेवी कुराडे, ज्योत्स्ना पताडे, महेश सलवादे, बाळासाहेब देसाई, मधुकर जांभळे, संस्थेचे बसवराज आजरी, राजू मांडेकर, अन्य पदाधिकारी, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, प्रा. बी. एस. पठाण यांच्यासह विद्या संकुलातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. एम. एस. घस्ती, डॉ. संदीप परीट, प्रा.श्रुती पाटील व अमन युथ सर्कलने परिश्रम घेतले.