गडहिंग्लज(प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा दुंडगे येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात संकेश्वर ते बांदा या महामार्गात सर्व बाधित शेतकरी, रस्त्याकडेचे घर व दुकानदार या सर्वांनी संघटनेसोबत राहून होणाऱ्या लढा परिषदेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाकडून न्याय मिळवून घेण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
तसेच दिनांक 30 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकेश्वर ते आंबोली पर्यंतच्या "टू व्हीलर रॅली"मध्ये सहभाग घेण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. गडहिंग्लज येथे 5 नोव्हेंबर रोजी राम मंदिर येथे होणारा "लढा परिषद" यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला. या मेळाव्यास प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.