🔘वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाविरोधात बालक व पालक रस्त्यावर
🔘निर्णय रद्द न झाल्यास सरकारला "सळो की पळो" करून सोडू : बाळेश नाईक
🔘आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी
🔘शेळीसह चिमुकल्या विद्यार्थ्याने घेतलेला सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेतले
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वीस पटा खालील शाळा बंदच्या निर्णयाविरोधात गडहिंग्लजला शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन देखील केले. या आंदोलनाचे नेतृत्व शाळा बचाव कृती समितीचे अध्यक्ष बाळेश नाईक यांनी केले.
या मोर्चाची सुरुवात महालक्ष्मी मंदिरापासून झाली. बाजारपेठेतून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. यावेळी या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शाळा बचाव समितीचे अध्यक्ष बाळेश नाईक, विष्णू पाटील, पी. एच. पाटील, सौरभ पाटील, महादेव धनगर, सुरेश कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी "शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे", "आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा" या विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात एका चिमुकल्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत शेळी आणली होती. त्यामुळे हा चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
सरकारला "सळो की पळो" करून सोडू : बाळेश नाईक
दरम्यान, हा मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चासमोर बोलताना शाळा बचाव कृती समितीचे अध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, शाळा टिकल्या पाहिजेत या हेतूने आपण सर्वजण हे आंदोलन करत आहोत. डोंगर कपारीतील तीन ते पाच किलोमीटर अंतरावरच्या शाळा टिकल्या पाहिजेत ही आमची भावना आहे. आमची ही भावना सरकारकडे व्यक्त करण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आजचा मोर्चा हा शेवटचा नसून ही तर सुरुवात आहे. लढाई आता सुरू केली आहे. ह्यापुढे "आर के पार" ची लढाई लढू. कोणत्याही परिस्थितीत शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सरकारला "सळो की पळो" करून सोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील श्री. नाईक यांनी यावेळी दिला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणात केलेली गुंतवणूक ही उज्वल भविष्याची गुंतवणूक असते. या गुंतवणुकीचा आर्थिक नफ्याशी ताळमेळ घालावयाचा नसतो. मानव विकास निर्देशांकामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षणाला विशेष स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी समाज सुधारकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातील मुले उच्चशिक्षित होत आहेत. वाड्या-वस्त्यांवरची, पालावरची मुले शिक्षणाच्या परिघात सामावली जात आहेत. 'वाडी तेथे शाळा' या धोरणामुळे शिक्षण गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचले आहे आणि त्याचे यशही आपण पाहिले आहे. पण दुर्देवाने वीस पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते. वीस पटाखालील शाळा बंद केल्या तर वाड्या-वस्त्यांवरची असंख्य मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जातील आणि पुन्हा एकदा विकासाची दारे वंचितांसाठी बंद होतील.
महात्मा गांधीजींनी 'खेड्याकडे चला' हा संदेश दिला. सोबत शेवटचा माणूस प्रक्रियेत यावा यासाठी शिक्षणाचा आग्रह झाला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 20 पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे विस्मरण करणार आहे असे वाटते. हा निर्णय दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून दूर करणारा ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काचे संरक्षण होण्यासाठी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचे अस्त्र देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारानुसार सदर आंदोलन करण्यात आले आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. गोरगरिबांच्या शाळा बंद करण्याचा विचाराधीन असलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या आंदोलनात हणमंतवाडी, शिंदेवाडी, हडलगे, तूपूरवाडी, तेगिनहाळ, मुंगुरवाडी, जांभुळवाडी यासह तालुक्यातील विविध गावांचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.