शुभेच्छासाठी "एक वही व पेन" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांचा वाढदिवस चिंचपाडा येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त हारतुरे व पुष्पगुच्छ यांना फाटा देत "एक वही व पेन" हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने शैक्षणिक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी बोलताना सतीश पेडणेकर म्हणाले, आई-वडिलांचे संस्कार व आशीर्वादाने तसेच माझ्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांमुळे समाजसेवेचा वटवृक्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. माझ्या हातून जी समाजसेवा घडत आहे त्यातून रोज नवनवीन नाती व मित्र निर्माण होत आहेत. हे सर्व नवनवीन मित्र तसेच नातलग दरवर्षी त्यांच्यात व माझ्यात निर्माण झालेले ऋणानुबंध कायम टिकून राहावेत यासाठी वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा शाल घेऊन येतात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता समाजात शैक्षणिक क्षेत्रात अनेक गरजू आहेत त्यांना शैक्षणिक साहित्यांची गरज आहे.
याचा विचार करून वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ याला फाटा देत "एक वही व पेन" देऊन शुभेच्छा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. आवाहनाला प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी श्री.पेडणेकर यांना विविध मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष संजय बिरंजे, उपाध्यक्ष संतोष पाटील, कार्याध्यक्ष सातोबा दाभोळे, खजिनदार संतोष इंगळे, सरचिटणीस अनिल कोकाटे, संदीप माणगावकर, दत्तात्रय पाटील, रामचंद्र मनगुतकर, विश्वनाथ पाटील मारुती नाईक, सचिन नाईक, संजय धुमाळे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते, मित्र परिवार नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.