"दोस्ती ग्रुप" चा पुढाकार; "आम्ही गावकरी" व्हाट्सॲप ग्रुपवरील आवाहनाला प्रतिसाद
गावातील सार्वजनिक ठिकाणांची केली स्वच्छता
गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी (ता. गडहिंग्लज ) येथील सार्वजनिक ठिकाणचे अस्वच्छ ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी "दोस्ती ग्रुप" च्या पुढाकाराने गावातील युवकांनी स्वच्छतेची वज्रमूठ बांधत एका दिवसात गावचे रुपडे पालटले. श्रमदान करत युवकांनी केलेल्या या कामाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
निलजी येथे कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेले सार्वजनिक विहिरी, विविध छोटी मोठी मंदिरे व परिसर, विविध रस्त्यांची दुरावस्था झाली होती. पालापाचोळा व वाढलेल्या गवतामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. हे दुर्लक्षित ठिकाण परिसराची साफसफाई करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत काही सूज्ञ नागरिकांनी व्यथा मांडत स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी येथील "दोस्ती ग्रुप"च्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम हाती घेत घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणच्या विहीरी, मंदिर परिसर, रस्ते पुन्हा अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. हे दुर्लक्षित ठिकाणे स्वच्छ व्हावीत यासाठी काही सुज्ञ नागरिकांनी 'आम्ही गावकरी' या व्हाटसॲप ग्रुपच्या माध्यमातून या सोशल मीडियाचा आधार घेत स्वच्छतेचे आवाहन केले.
हे गांभीर्य ओळखून युवा कार्यकर्ता अजय मजगी याच्या नेतृत्वाखाली "दोस्ती ग्रुप" ने स्वच्छतेची वज्रमूठ बांधली व प्रत्यक्ष कामास सुरुवात करून या ठिकाणी असलेले वेली, अनावश्यक झाडेझुडपे, पालापाचोळा, मातीचे ढिगारे,दगडे गोळा करून विल्हेवाट लावली तसेच विहिरीतील गाळ, प्लास्टिक बाटल्या गोळा करुन स्वच्छ केली. सार्वजनिक मंदिराच्या रंगरंगोटीचे काम हाती घेऊन एक आदर्श निर्माण केला. तसेच दर आठवड्यातून एक तास युवकांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प करून ते काम प्रत्यक्षात उतरवत आहेत. या सामाजिक कार्याबद्दल या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.