अत्याधुनिक यंत्राद्वारे अचूक व कमी वेळेत उपचार शक्य
हसुरवाडी: येथील संत गजानन महाराज ऑन्कोलाईफ रुग्णालयातील आधुनिक रेडियेशन मशिन सोबत प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रिती पाटील.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरवाडी ( ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज ऑन्कोलाईफ या हॉस्पिटलमध्ये लवकरच कॅन्सर (कर्करोग ) रुग्णांसाठी निदान व उपचार सेंटरची सुरुवात होणार असून येथे उपलब्ध असलेले भारतातील सर्वात आधुनिक रेडिएशन उपचार यंत्रामुळे अचूकतेने कॅन्सर पेशी वर उपचार कमीत कमी कालावधीत करणे शक्य होणार असल्याची माहिती डॉ. संजय चव्हाण यांनी दिली.
गेल्या पंचवीस वर्षापासून गरजू व सर्वसामान्यांच्या स्वस्त व खात्रीशीर उपचारासाठी संत गजानन महाराज हॉस्पिटल नामांकित रुग्णालय पैकी एक आहे. गडहिंग्लज उपविभागातील अनेक गरजूंना कमी खर्चात अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवली असून अत्याधुनिक यंत्रणा उत्तम आरोग्य सुविधा हे या हॉस्पिटलच्या वैशिष्ट्य आहे. सध्या भारतात दरवर्षी लाखो रूग्ण कॅन्सरचा उपचार योग्य वेळी न मिळाल्याने मृत्यू होतात. ही समस्या सध्या सर्वत्र भेडसावू लागली आहे. या आजाराचे गांभीर्य ओळखून सामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी या सेंटरची उभारणी केली आहे. येथे रुग्णांवर सर्जरी, रेडिएशन, आणि केमोथेरपी हे तिन्ही उपचार होणार आहे.प्रत्येक उपचार पध्दतीचे तज्ञ डॉक्टर व त्यांची टिम येथे पुर्णवेळ उपलब्ध आहेत. यासाठी प्रदीर्घ अनुभव असणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला रेडियेशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून परिचित असणाऱ्या डॉ. प्रीती पाटील या पूर्णवेळ येथे उपलब्ध असणार आहेत. त्या एम्स हॉस्पिटल दिल्ली व अमेरिका येथे प्रशिक्षित एमडी रेडियेशन ऑन्कॉलॉजीस्ट आहेत. इतर अनुभवी तज्ञ डॉक्टर व नर्स स्टाफ ची टीम ही येथे चोविस तास उपलब्ध असणार आहे.
यामुळे गडहिंग्लज,आजरा,चंदगड व गारगोटी परिसरातील ग्रामीण भागात अत्याधुनिक सर्वसामान्य रुग्णांना परवडतील अशा कॅन्सरची वैद्यकीय सेवा येथे एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. तसेच शासकीय जन आरोग्य योजनेतील पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना हा उपचार मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.