कोल्हापूर (प्रतिनिधी): वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अनिल मल्लय्या स्वामी तर उपाध्यक्षपदी सदानंद राजकुमार हत्तरकी यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे जेष्ठ संचालक नानासो उर्फ विश्वनाथ नष्टे होते.
अध्यक्षपदासाठी अनिल स्वामी यांचे नाव मावळते अध्यक्ष राजेंद्र लकडे यांनी सुचविले त्यास संचालिका सौ.रंजना तवटे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी सदानंद हत्तरकी यांचे नाव संचालक वैभव सावर्डेकर यांनी सुचवले. त्यास संचालक राजेंद्र माळी यांनी अनुमोदन दिले.
बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल स्वामी हे इचलकरंजी येथील प्रसिद्ध यंत्रमाग उद्योजक आहेत. ते 2010 पासून बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. अनिल स्वामी यांनी उपाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत बँकेला उच्चांकी नफा मिळवून दिला आहे.
उपाध्यक्ष सदानंद हत्तरकी हे मूळचे हलकर्णी येथील असून वीरशैव बँकेत 2014 पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच विविध संस्थांमध्ये ते पदाधिकारी असून एक प्रगतशील शेतकरी देखील आहेत.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष अनिल स्वामी म्हणाले, बँकेचा 150 कोटीचा स्वनिधी असून सध्या 1055 कोटी ठेवी आहेत. 767 कोटीची कर्जे तर 503 कोटीची गुंतवणुक आहे. बँकेचा शून्य टक्के एनपीए आहे. बँकेचा तीस शाखांचा विस्तार आहे. यापुढे बँकेला शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून कर्नाटकात देखील शाखा विस्तार व व्यवसाय वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासो नष्टे, संचालक गणपतराव पाटील, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश खोत यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष राजेंद्र लकडे यांनी सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.