🔘मलप्रभा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
🔘नवलतीर्थ धरण पूर्ण क्षमतेने भरले
🔘धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
🔘मुनवळळीतील जुना पूलही पाण्याखाली
🔘पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस
🔘निपाणी तालुक्यातील पाच पूल पाण्याखाली
सौंदत्ती: पावसाचा धुमाकूळ सुरूच असून या पावसाने कर्नाटकातील जनजीवनही विस्कळीत बनले आहे.मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला आहे. मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या नवलतीर्थ धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर मुनवळळी शहरातील जुना पूलही पाण्याखाली गेला आहे. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे.
या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीत ८ हजार क्युसेक पाणीसाठ्याची नोंद आहे. या नदीवरील नवलतीर्थ धरणातून 10 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मलप्रभा नदीचे उगम स्थान असलेल्या कणकुंबी भागात पावसाचा जोर कायम असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी काठावरील लोकांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
निपाणी तालुक्यातील ५ पूल पाण्याखाली
निपाणी : दूधगंगा - वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी निपाणी तालुक्यातील ५ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नजीकच्या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे दुधगंगा नदी पलीकडे असलेला कारदगा-भोज, मलिकवाड- दत्तवाड, बोरगाव- कुन्नूर तसेच वेदगंगा नदीवरील भोजवाडी-कुन्नूर आणि सिदनाळ- अंकोला त्याचप्रमाणे जत्राट-भिवशी ला जोडणारे पूलही पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने कारदगा गावातील बंगाली बाबा मंदिराला पाण्याने वेढले आहे.यंदाच्या पावसाळ्यात निपाणी तालुक्यातील पुल आणि हे मंदिर पाण्याखाली जाण्याची ही तिसरी वेळ आहे.