गडहिंग्लज (प्रतिनिधी) : रामायणातील महिलांच्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या 'सीतायण' नांवाच्या महाकादंबरीच्या वाचनावर अभिनव स्वरूपाच्या महास्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांनी लिहिलेल्या साडेसातशे पृष्ठांच्या या प्रसिद्ध पौराणिक कादंबरीचे प्रकाशन सात वर्षापूर्वी झालेले असून या कादंबरीने आधुनिक साहित्याच्या क्षेत्रात खळबळ उडवून दिलेली आहे. प्रसिद्ध प्रकाशक आणि लेखक चंद्रकांत निकाडे यांनी गेले तीन महिने दररोज सातत्याने त्यांच्या 'शिक्षणयात्रा' चॅनेलमार्फत क्रमश:वाचन सुरु केलेले आहे.
आतापर्यंत पूर्ण झालेल्या एकशे एकवीस दिवसातील वाचन प्रक्रियेच्या संदर्भात वाचक व श्रोते यांच्यामध्ये एका अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. येथून पुढे दर दहा दिवसाच्या वाचन भागावर एकूण अकरा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या एक ते तीन विजेत्या स्पर्धकांना योग्य ती बक्षीसे व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या शिवाय या एकशे एकवीस वाचन प्रसंगावर आधारित ज्या अकरा स्पर्धा आयोजित होतील त्यातील अकरा विजेत्या स्पर्धकांना दि.२७ रोजी प्रतिष्ठीत पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच राज्यपातळीवरील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या निरनिराळ्या जिल्ह्यातील स्पर्धकांना ज्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील कार्यक्रमातही स्वतंत्रपणे बक्षीसे देऊनही गौरविले जाणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिध्द नामवंत अकरा साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत. हा अभिनव व व्यापक स्वरूपाचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी साहित्यिकांनी, वाचकांनी ब कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन 'शिक्षणयात्रा' चॅनेलचे संयोजक चंद्रकांत निकाडे व प्रसिद्ध साहित्यिक मुरलीधर देसाई यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी तसेच आतापर्यंत झालेल्या एकशे एकवीस भागातील वाचनाची ध्वनी प्रत प्राप्त करून घेण्यासाठी संयोजक चंद्रकांत निकाडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ९९२२३१४५६४ "शिक्षणयात्रा" चॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे.