Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुगडीकट्टी- गडहिंग्लज बसला प्रचंड गर्दी, विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांचे हाल

🔈सकाळ ८.५० ची बुगडीकट्टी- गडहिंग्लज बस "हाऊसफुल्ल"

🔈सकाळी ८ ची हलकर्णी बस तेरणीपर्यंत सोडण्याची मागणी

🔈प्रवाशांसह ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
सकाळी ८.५० च्या बुगडीकट्टी- गडहिंग्लज बसला प्रचंड गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी गर्दीमुळे काही विद्यार्थ्यांना व कामानिमित्त गडहिंग्लजला जाणाऱ्या इतर प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. या गर्दीचा विचार करता गडहिंग्लज आगाराने सकाळी ८ वाजता हलकर्णीपर्यंत येणारी एसटी बस तेरणीपर्यंत सोडावी अशी जोरदार मागणी येथील विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत आहे. दरम्यान, याबाबत तेरणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याबाबत गडहिंग्लज आगाराचे निवेदनातून लक्ष वेधून देखील अद्याप कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळी ८.५० वाजता परत जाणारी बुगडीकट्टी- गडहिंग्लज ही बस महाविद्यालयीन विद्यार्थी, इतर शालेय विद्यार्थी, विविध आस्थापनात काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर प्रवाशांसाठी सोयीचे आहे. मात्र ही बस बुगडीकट्टी वरूनच प्रवाशांनी भरून येते. तेरणीतही ह्या बसला प्रचंड गर्दी होते. मुळातच बुगडीकट्टीवरून ही बस भरून येत असल्याने तेरणीत बसमध्ये चढणाऱ्या सर्व प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. तेरणीतच ही बस हाऊसफुल्ल होते. परिणामी काही विद्यार्थी व कामानिमित्त गडहिंग्लजला जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे नाईलाजास्तव बस चुकवून घ्यावी लागते. गर्दीमुळे त्यांच्या पुढील कामाचा खोळंबा होत आहे.  

सकाळी आठ वाजता हलकर्णीपर्यंत येणारी गडहिंग्लज- हलकर्णी ही बस तेरणीपर्यंत सोडण्यात यावी या मागणीचे निवेदन तेरणी ग्रामपंचायतीमार्फत दिनांक २४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज आगाराला देऊन लक्ष वेधण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काहीही करून खचाखच भरलेल्या बसमधून दाटीवाटीने उभे राहून महाविद्यालय गाठावे लागते. बऱ्याचदा पुन्हा प्रवासी संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना दुचाकीवरून महाविद्यालय गाठावे लागत आहे. 

सध्या या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना गडहिंग्लज शिवाय पर्याय नाही. मात्र एसटी बसला होत असणाऱ्या गर्दीमुळे विद्यार्थिनींचे मोठे हाल होत आहेत. गडहिंग्लजपर्यंत तासभर थांबूनच दररोजचा प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच वयोवृद्ध प्रवासी वर्ग व आजारी व्यक्तींना दवाखान्यासाठी प्रवास करून जाताना गर्दीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

 सकाळी ८.५० च्या एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी गडहिंग्लज आगाराने सकाळी ८.४० वाजता तेरणी गडहिंग्लज ही बस सुरू केली होती, त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी या बसमधून प्रवास करीत होते. परिणामी ८.५० वाजता परत जाणारी बुगडीकट्टी गडहिंग्लज ह्या बसवर ताण कमी पडत होता. या बसला उर्वरित विद्यार्थी व इतर प्रवासी वर्ग जात होता.त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत होता. आगाराने या गर्दीचा विचार करता एक तर पूर्वीप्रमाणे गडहिंग्लज तेरणी बस सुरू करावी अन्यथा सकाळी ८ वाजता हलकर्णीपर्यंत येणारी एसटी बस तेरणीपर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी येथील प्रवासी वर्गातून होत आहे.

दरम्यान, या संदर्भात तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला, सदस्य करवीर उथळे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी आगार प्रमुखांना भेटून हलकर्णीपर्यंत येणारी बस तेरणीपर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनातून केली होती. मात्र याबाबत आगाराकडून अद्याप कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बस चुकल्यास शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तेरणीतील प्रवासी वर्ग संतप्त झाला असून तातडीने यावर तोडगा न काढल्यास प्रवाशांसह ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.