३४ नवीन औषधांसह ३८४ औषधांचा समावेश
नवी दिल्ली ( सौजन्य: पीआयबी): केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (एनएलईएम) 2022 जाहीर केली. या यादीत आणखी ३४ औषधांची भर घालून ३८४औषधांचा समावेश करण्यात आला आहे, तर गेल्या यादीतील २६ औषधे वगळण्यात आली आहेत. या औषधांचे २७ उपचारात्मक श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
“सर्वांना औषधे, स्वस्त औषधे' या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय विविध पावले उचलत आहे. या दिशेने, आरोग्य सेवेच्या सर्व स्तरांवर परवडणाऱ्या किंमतीतील दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (एनएलईएम) महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे किफायतशीर, दर्जेदार औषधांना चालना मिळेल आणि आरोग्य सेवेवरील नागरिकांचा स्वतःच्या खिशातून होणारा खर्च कमी होण्यास हातभार लागेल.'', असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितले.
परिणामकारकता, सुरक्षितता, गुणवत्ता आणि उपचारांच्या एकूण खर्चावर आधारित आरोग्य सेवेच्या प्राधान्य गरजा "अत्याआवश्यक औषधे" पूर्ण करतात. किंमत, सुरक्षितता आणि परिणामकारकता या तीन महत्त्वाच्या पैलूंचा विचार करून औषधांच्या तर्कशुद्ध वापराला प्रोत्साहन देणे हा अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा प्राथमिक उद्देश आहे. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी हा एक गतिशील दस्तऐवज असून सार्वजनिक आरोग्याचा बदलता प्राधान्यक्रम तसेच औषध उत्पादनातील ज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन त्यात नियमितपणे सुधारणा केली जाते, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी प्रथम १९९६ मध्ये तयार करण्यात आली होती आणि २००३, २०११ आणि २०१५ मध्ये या यादीत तीन वेळा सुधारणा करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१८ मध्ये औषधांसंदर्भात स्वतंत्र स्थायी राष्ट्रीय समिती (एसएनसीएम ) स्थापन केली. या समितीने तज्ज्ञ आणि भागधारकांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या २०१५ च्या यादीमध्ये सुधारणा केली आणि राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी २०२२ संदर्भातील आपला अहवाल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला सादर केला.
सुधारित राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीसाठी हितसंबंधितांचे अभिनंदन करत, हे पाऊल आपल्या नागरिकांना स्वस्त आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेने देशाला पुढे नेत आहे, असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी, प्रतिजैविक प्रतिरोधासंदर्भात (एएमआर ) जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. ''हे आपल्या शास्त्रज्ञांसाठी आणि समुदायासाठी एक मोठे आव्हान म्हणून उदयाला येत आहे त्यामुळे आपल्याला प्रतिजैविक प्रतिरोधासंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी येथे पाहता येईल
https://cdsco.gov.in/opencms/opencms/system/modules/CDSCO.WEB/elements/download_file_division.jsp?num_id=OTAxMQ