"हे पब्लिक है, सब जानती है"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
दिल्लीत राज्य प्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित
नवी दिल्ली : जनतेच्या हितासाठी सत्ता सोडून उठाव करणारे आम्ही पहिले आहोत. आम्ही क्रांती केल्याने आज शिवसैनिकांना अच्छे दिन आले आहेत. असे सांगून आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात राज्य प्रमुखांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील मेळाव्यात केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज होती. त्यामुळे सत्तेची लालसा न बाळगता आम्ही सत्तेतून बाहेर पडून उठाव केला. या उठावाची जगातील 33 देशानी देखील दखल घेतली. आमच्या भूमिकेचा जनतेनेही स्वीकार केला. अन्यायाची परिसीमा ओलांडल्याने आम्ही हा उठाव केला. सत्ता सोडून उठाव करणारे आम्ही पहिले आहोत. काहीजण मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत आहेत. होय मी राज्य पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे. राज्यातील भुमिपुत्राला, विद्यार्थ्यांना, माता-भगिनींना न्याय मिळवून देण्याचे मी कंत्राट घेतले आहे. आम्ही तुम्हाला तीन महिन्यांपूर्वीच आस्मान दाखविले आहे. आम्हाला आस्मान दाखविण्याची वेळ येणार नाही. आम्ही तुम्हाला कामातूनच उत्तर देऊ असे सांगत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांनी सत्तेसाठी आपल्या विचारधारेशी कधीच तडजोड केली नाही. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. बाळासाहेबांचे आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. गद्दारी आमच्या रक्तात नाही हे जनतेला माहित आहे.गद्दार कोण आहेत हे जनता ओळखते असे सांगत "हे पब्लिक है, सब जानती है" असा टोला देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी लगावला.