🔘कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर करणार आंदोलन
🔘१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याची मागणी
🔘शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने निवेदन सादर
![]() |
कोल्हापूर : शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांना निवेदन देताना अरविंद मगदूम, मुख्याध्यापक विजय जाधव, संजय मोरे, श्रीधर गोंधळी, सुदेश जाधव व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोअर कमिटी यांच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी म्हणून गेले १३ वर्षे महाराष्ट्र शासनाकडे न्याय, हक्कासाठी संघर्ष करीत आहोत. २००५ पूर्वीची नियुक्त तारीख ग्राह्य धरून आम्हाला न्याय मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आम्ही न्यायप्रविष्ट आहोत. मात्र शिक्षण संचालकांनी २००५ पूर्वी कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते काढा अन्यथा वेतन थांबविण्यात येईल असे काही जिल्ह्यांमध्ये आदेश काढले आहेत. त्याला २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना असे आदेश काढणे हे कायद्याने चुकीचे आहे.
पेन्शन हा विषय आम्हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जीवन मरणाचा प्रश्न आहे. या न्याय हक्कासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २४ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन २००५ पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे.
या आंदोलनाबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले. यावेळी अरविंद मगदूम, मुख्याध्यापक विजय जाधव, संजय मोरे, श्रीधर गोंधळी, सुदेश जाधव, अशपाक मुरसल, विजय कोंडुसकर, अजित गणाचार्य, अजित कांबळे, हरीश जाधव, सुधाकर नौकूडकर, सलीम नुलकर उपस्थित होते.