Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

३३.४० कोटी रुपये किमतीचे सोने जप्त

🔈सोने तस्करीचे प्रयत्न डीआरआयने हाणून पाडला 

🔈मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथून  ६५.४६ किलो सोने जप्त

🔈महसूल गुप्तचर संचालनालयाची सर्वात मोठी कारवाई


नवी दिल्ली ( सौजन्य: पीआयबी ):
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने  जप्तीच्या कारवाईतील सातत्य कायम ठेवत सुमारे ६५.४६ किलो वजनाची आणि ३३.४० कोटी (अंदाजे) रुपये किमतीची मूळ परदेशी सोन्याची ३९४ बिस्किटे जप्त केली आहेत. ईशान्येकडून त्याची तस्करी होत होती. 

मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचा  वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली.

तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे "ऑपरेशन गोल्ड रश" ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेला  जाणारा ‘वैयक्तिक वस्तू’ घोषित केलेला विशिष्ट माल अडवण्यात आला. भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे १९.९३ किलो वजनाच्या आणि सुमारे १०.१८ कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे १२० नग जप्त करण्यात आले.

 तपासणीत असे दिसून आले की इतर २ वेळा त्याच एका व्यक्तीने त्याच लॉजिस्टिक कंपनीद्वारे त्याच ठिकाणाहून माल मुंबईला पाठवला आहे. यावेळी लोकेशन ट्रेस करण्यात आले.मालाची दुसरी खेप बिहारमध्ये अडवली गेली . लॉजिस्टिक कंपनीच्या गोदमामध्ये तपासणी केल्यावर, सुमारे २८.५७ किलो वजनाची आणि सुमारे १४.५० कोटी रुपयांची १७२ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली हबमध्ये माल अडवण्यात आला आणि त्याची तपासणी करण्यात आली. सुमारे १६.९६ किलो वजनाचे आणि ८.६९ कोटी रुपये किमतीचे विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटाचे १०२ नग जप्त करण्यात आले.

तपासांच्या या मालिकेमुळे  ईशान्येकडील भागातून आणि लॉजिस्टिक कंपनीच्या देशांतर्गत कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन विशेष पद्धत शोधण्यात मदत झाली आहे. तस्करीच्या वेगळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची डीआरआयची क्षमता अशा मोहिमांमुळे वृद्धिंगत  होते. सुमारे ६५.४६ किलो वजनाचे आणि अंदाजे ३३.४० कोटी रुपये किमतीचे एकूण ३९४ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे  या अनेक शहरांत राबवलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.