दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : उद्धव ठाकरे
"गद्दारांची लक्तरे दसऱ्याला काढणार"
मुंबईत शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला केले संबोधित
मुंबई ( प्रतिनिधी ): शिवसेना म्हणजे मुंबईकरांचा विश्वास आहे. ज्या शिवसेनेने सर्व काही दिले त्यालाच गिळायला काहीजण निघाले आहेत. अशा या गद्दारांची लक्तरे येत्या दसरा मेळाव्यात काढू असे सांगत शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगत भाजप व शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी "मिंधे गटाची" अवस्था झाली आहे असा निशाणा देखील ठाकरे यांनी यावेळी साधला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को सभागृहात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या गटप्रमुखांच्या या सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर दसरा मेळाव्याला किती गर्दी होईल. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवून दाखवा असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. मुंबईचे लचके तोडण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. मात्र मुंबईकर त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडतील. अशांना आम्ही आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील ठाकरे यांनी यावेळी दिला.
शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझ्या आजोबांचे योगदान आहे. सध्या वंशवादावर टीका केली जाते मात्र मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे इतरत्र निघून जात आहेत. हे दुर्दैवी आहे. मुंबईकरांचा श्वास म्हणजे शिवसेना आहे. या शिवसेनेने मुंबईकरांची मने जिंकली आहेत. मुंबईत कोणतीही आपत्ती येते तेव्हा शिवसैनिकच धावून जातो. मुंबईवर झालेल्या 26 /11 हल्ल्यावेळी कमांडोना शिवसैनिकांनीच जीवाची परवा न करता मदत केली होती. गोळीबारात एका शिवसैनिकाचाही मृत्यू झाला होता. प्रत्येक प्रसंगात नेहमी शिवसैनिकच धावून जातो. आम्ही जे करतो त्याची जाहिरात करत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी आधी मुंबईकरांची मने जिंकावी लागतात असे सांगत विरोधकांवर ठाकरे यांनी निशाणा साधला.
शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला कोणीही येण्याचा प्रयत्नही करू नये असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.गद्दार असण्यापेक्षा सोबत मुठभर असलेले बरे. आज आम्ही करून दाखवले म्हणून मुंबईकरांनी आम्हाला मते दिली. येथील अमराठी माणूस देखील शिवसेनेसोबतच आहे. आता विरोधकांचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर टिकास्त्र सोडले.
मनपा निवडणुकी बाबत बोलताना ठाकरे म्हणाले, हिंमत असेल तर महिन्याभरात मनपाची निवडणूक लावून दाखवा असे आव्हान देखील ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
आपल्याकडे काही नाही असे समजून कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा लढा द्यावा. आपल्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कार्यकर्त्यानी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.