भरकटत चाललेल्या तरुणांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक : ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील शिवराज महाविद्यालयात "शिवराज 2022" नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 'तरुण भारत'चे प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, डॉ. महेश चौगुले, प्रा. बियामा वाटंगी, शिवशाही पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ए. जी. हारदारे व रजिस्ट्रार असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष शहापूरकर व विद्यार्थी लेखिका कुमारी अक्षता राजपूत आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील म्हणाले, आजच्या तरुणाईला मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे भरकटत चाललेल्या या तरुणांना वेळीच वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे आणि आपल्या ज्ञानात भर घालणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास संचालक श्री. नंदनवाडे गुरुजी, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांच्यासह नियतकालिकेचे संपादक प्रा. आशोक मोरमारे व संपादकीय मंडळ सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.