🔘गडहिंग्लजमध्ये एका युवा उद्योजकाची आर्त हाक
🔘 पावसामुळे गटारीचे काम रखडल्याने दुकानाकडे जाणारा रस्ताच झाला बंद; निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न
🔘रस्त्याअभावी गेले दीड महिना झाले व्यवसाय झालाय ठप्प
🔘उपविभागीय अधिकारी यांच्या नावे निवेदन सादर
🔘पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची निवेदनातून मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका अशी आर्त हाक गडहिंग्लज मधील युवा उद्योजक अवधूत घुगरे यांनी दिली आहे. त्यांच्या दुकाना जवळील गटारीचे काम पावसामुळे रखडल्याने दुकानाकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे केवळ दुकान उघडणे व दुकानात बसून येणे हा नित्यक्रम त्यांचा सुरू आहे. परिणामी रस्त्याअभावी दुकानाचा माल उचलला जात नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात जय जवान जय किसान फाउंडेशनचे कुमार पाटील यांच्या मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत याकडे युवा उद्योजक अवधूत घुगरे यांनी लक्ष वेधले आहे. तातडीने काम संपेपर्यंत पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
![]() |
गडहिंग्लज: उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून सचिन हाके यांच्याकडे निवेदन सादर करताना युवा उद्योजक अवधूत घुगरे व जय जवान जय किसान फाउंडेशनचे कुमार पाटील. |
याबाबतची अधिक माहिती अशी, गडहिंग्लज मधील भैरी रोडवरील लाखेनगर ओढ्याचे काम सुरू आहे. सध्या पावसामुळे हे काम थांबले आहे. या मार्गावर अवधूत घुगरे यांचे काळभैरव स्टील ट्रेडर्स हे दुकान आहे. त्यांच्या दुकानाजवळ गटारीचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र पाऊस सुरू झाल्याने हे काम रखडले आहे परिणामी या खड्ड्यात पाणी साचल्याने त्यांच्या दुकानाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास दीड महिना होऊन गेला काळभैरव स्टील ट्रेडर्सचे मालक अवधूत घुगरे यांचा व्यवसाय बंद पडला आहे. रस्त्या अभावी एका कोपऱ्यातून वाट काढत ते आपल्या दुकानात जाऊन फक्त खुर्चीवर बसून घरी निघून जातात. यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
घुगरे यांचा आई-वडील,बहिण,भाऊ असा परिवार आहे.अवधूत हेच मोठे असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या उद्योगातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र रस्त्या अभावी व्यवसायावर परिणाम झाल्याने त्यांना पोटाला कसे घालायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दुकानाचा रस्ताच बंद झाल्याने त्यांनी पालिका प्रशासन व संबंधित कॉन्टॅक्टर यांचे याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, शुक्रवारी जय जवान जय किसान संघटनेचे प्रमुख कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवधूत घुगरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देत त्यांच्या या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे निवेदन अव्वल कारकुन सचिन हाके यांनी स्वीकारले. याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा व गेले दीड महिने झाले बंद असलेला व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी संबंधितांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी घुगरे यांनी या निवेदनातून केली आहे.