Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना मनसेचे निवेदन

गडहिंग्लज: उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकार यांच्या नावे देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देणारे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात गडहिंग्लज तालुक्यातील नागरिक विविध उपचारासाठी येत असतात. कोरोना काळात तर सर्वसामान्य रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय हे जीवनदायी ठरले होते. बरेचसे रुग्ण या काळात बरे होऊन घरी परतले आहेत. याचबरोबर प्रसूती, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया याचबरोबर विविध अपघात तसेच दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिकांची या रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. असे असून देखील बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी पूर्णवेळ सिव्हिल सर्जन तसेच इतर महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे दिसते. 

मध्यंतरी काही काळ पूर्णवेळ तर काही काळ प्रभारी म्हणून या ठिकाणी सिव्हिल सर्जनने काम देखील पाहिले आहे, पण सध्या या ठिकाणी एकही सिव्हिल सर्जन पूर्णवेळ कार्यान्वित नाही.

उपजिल्हा रुग्णालय एक महत्त्वाचे शासकीय रुग्णालय असून सुद्धा या ठिकाणी जबाबदार असलेले हे पद रिक्त असल्याने या रुग्णालयाला कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकारी नसणे खेदाची बाब असल्याने नागरिकांच्याकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील भोंगळ कारभाराबाबत मध्यंतरी मनसेच्या वतीने खळखट्याक आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. या ठिकाणी सिव्हिल सर्जन तसेच एम.डी व विविध रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून मनसेने दिला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे,शहर अध्यक्ष केप्पान कोरी, सुरज  सोरटे, रोहित देवार्डे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.