Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराकडून सहा क्षेपणास्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचण्या यशस्वी


नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी)
:संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर एकात्मिक परिक्षण केंद्रावरून शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या जमीन ते आकाश मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहा उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतल्या. 

या उड्डाण चाचण्या उच्च वेगाच्या हवाई लक्ष्यांच्या विरोधात घेण्यात आल्या, ज्यात विविध स्वरूपाच्या आकाशस्थ धोक्यांचा समावेश होता. भारतीय क्षेपणास्त्रांच्या क्षमतेचे विविध परिस्थितींमध्ये म्हणजे दीर्घ पल्ल्याचे मध्यम उंचीवरील लक्ष्य, लघु पल्ल्याचे लक्ष्य, उंच प्रदेशातील युद्धाभ्यासातील लक्ष्य, रडारवरील वेगवेगळ्या अवस्थांतील लक्ष्य आणि लागोपाठ अतिवेगाने मारा करणारे दोन लक्ष्ये यांवर मारा करून मूल्यांकन करण्यात आले. दिवसा आणि रात्रीच्या परिस्थितीतही प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. या उड्डाण चाचण्यांच्या दरम्यान या मोहीमेची सर्व उद्दिष्टे साध्य झाली आणि स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्र साखळीसह अत्याधुनिक मार्गदर्शन तसेच आदेश आणि नियंत्रण नियमावलीसह मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची अचूकताही प्रस्थापित झाली. चांदीपूर केंद्रावर तैनात केलेल्या टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली यासह विविध साधनांद्वारे गोळा केलेल्या माहितीच्या माध्यमातून प्रणालीच्या कामगिरीला दुजोरा देण्यात आला आहे. डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हे या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी झाले होते.

स्वदेशी बनावटीची रेडिओ फ्रिक्वेन्सी पकडणारी क्षेपणास्त्रे, मोबाईल लॉंचर, पूर्णपणे स्वयंचलित आदेश आणि नियंत्रण प्रणाली, टेहळणी आणि इतरही अनेक कामे करणारे रडार यासह विविध स्वदेशी बनावटीच्या उपप्रणाली यांचा समावेश असलेल्या क्षेपणास्त्राची अंतिम तैनाती ठरवण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या. शीघ्र प्रतिसाद देणारी जमीन ते आकाश मारा करणारी क्षेपणास्त्रे प्रणाली ही लक्ष्याचा झटपट शोध घेऊन हालचाली करण्यास सक्षम असून ती अचूक मारा करू शकते. यापूर्वी गतिशीलतेसाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे या यशस्वी उड्डाण चाचण्यांबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी शीघ्र प्रतिसाद देणारी जमीन ते आकाश मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सशस्त्र दलांची शक्ती वाढवणारी उत्कृष्ट प्रणाली ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष यांनीही यशस्वी चाचण्यांशी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. भारतीय लष्करात सामील करण्यासाठी आता प्रणाली सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.