Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार ११ दिवसांनी गोव्यावरून मुंबईत दाखल


मुंबई (प्रतिनिधी)
: तब्बल अकरा दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व आमदार गोव्याहून शनिवारी रात्री मुंबईत दाखल झाले. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाची निवड असल्याने या पार्श्वभूमीवर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता  हे आमदार हॉटेलमधून विधान भवनाकडे जाणार आहेत. या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार व भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड  केल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार २१ जून रोजी त्यांच्या समवेत सुरतला गेले त्यानंतर आसाममधील गुवाहाटी व नंतर गोव्यात थांबले होते.  तब्बल अकरा दिवसांनी हे आमदार गोव्यावरून थेट मुंबई दाखल झाले.

मुंबई विमानतळावर ते खास विमानाने उतरल्यानंतर त्यांना विशेष गाड्यांमधून हॉटेल ताज प्रेसिडेंटकडे नेण्यात आले. या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार व भाजपच्या आमदारांची एक संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना पुढील रणनीती बाबत मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात या आमदारांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.