विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर विजयी
मुंबई( प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपचे उमेदवार ॲड. राहुल नार्वेकर हे विजयी झाले. नार्वेकर यांना १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७मते मिळाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निकालाची घोषणा केली.
विधानसभा अध्यक्ष पदासाठी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निवडणुकीची घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवडणूक झाली. शिरगणतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपचे उमेदवार ॲड. नार्वेकर यांना १६४ तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. यामध्ये ॲड. नार्वेकर हे बहुमताने विजयी झाले. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. देशाच्या इतिहासात विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झालेले ॲड. राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण अध्यक्ष असल्याचे सांगितले.
विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांनी कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन केले व विधानभवनाकडे रवाना झाले. अकरा वाजता सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. आवाजी मतदानाची प्रक्रिया बारा वाजता संपली त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.