![]() |
कोल्हापूर : येथे गंगाधर वृत्तपत्र समूहाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज हे खरोखरच राजर्षी या पदवीला पात्र ठरणारे कर्तृत्ववान विशाल व्यक्तिमत्व होते. समाजाकडे व्यापक मानवतावादी व सर्व समावेशक दृष्टीने पाहण्याचा आणि समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देण्याचा त्यांचा स्वभावधर्म होता, म्हणूनच त्यांनी सामाजिक सुधारणाच्या क्षेत्रात सव्वाशे वर्षांपूर्वी अतुल्य स्वरूपाचे क्रांतीकारक कार्य करून दाखविले. त्यावेळी प्रतिगामी विचाराच्या काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला. आजही असेच काही संकुचित विचाराचे लोक त्यांना जाती-धर्माच्या संकुचित चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या नेतृत्वावर व कर्तुत्वावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांच्यावर अन्याय आणि सामाजिक स्वरूपाचे पापच ठरणार आहे असे मत 'सीतायण'कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात दसरा चौकातील शाहू सभागृहात आयोजित समारंभात ते बोलत होते. गंगाधर वृत्तपत्र समूहाच्या साहित्य परिषदे मार्फत प्रा.कुराडे यांना त्यांनी नुकत्याच पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेल्या शाहू महाराजांच्या चरित्र ग्रंथासाठी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी 'स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर' या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. न्यायमूर्ती अमोल देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांच्या हस्ते प्रा. कुराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. गंगाधर साहित्य परिषदेचे संपादक कमलाकर वर्टेकर आणि शाहू चरित्रकार जे.के.पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक शाम कुरळे, ज्येष्ठ समाजवादी नेते हसनभाई देसाई, साहित्यिक एम.डी. देसाई, समीक्षक श्री. कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.