Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिंदे- फडणवीस सरकारने "कसोटी" जिंकली

 १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई(प्रतिनिधी) : विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शिंदे व फडणवीस सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ एवढी मते मिळाली.काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडीतही बाजी मारल्यानंतर आज  विश्वासदर्शक ठरावही बहुमताने सिद्ध करत अंतिम कसोटी शिंदे व फडणवीस सरकारने जिंकली आहे.

आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले. प्रारंभी सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आले. मात्र मत विभागणीची मागणी केल्याने दोन्ही बाजूने शिरगणती करण्यात आली. या  शिरगणतीत शिंदे व भाजप सरकारला १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीला ९९ एवढी मते मिळाली.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आतापर्यंत बऱ्याच राजकीय घडामोडी, विविध राजकीय धक्कातंत्रही पाहावयास मिळाले.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली होती. या निवडीला विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी  मान्यता दिली होती. त्यानंतर झालेल्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड करण्यात आली होती. या निवडीला उपाध्यक्ष झिरवाळ यांनी  मान्यता देण्यास नकार देऊन सुनील प्रभू हेच पक्ष प्रतोद असल्याचा निर्णय दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे याचिकेद्वारे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी व्हायची आहे.या सर्व घडामोडी घडल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्ष पदासाठी  निवडणूक झाली. यामध्ये शिंदे व फडणवीस सरकारने बाजी मारली व अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड होताच गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांच्या निवडीला मान्यता देण्यात आली. दरम्यान आज सकाळी बहुमत चाचणी होण्यापूर्वी कालपर्यंत ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार संतोष बांगर हे देखील शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आज आणखी एक राजकीय धक्कातंत्र पाहाव्यास मिळाले. एकंदरीत गेले तेरा दिवस सुरू असलेले राजकीय नाट्य आज संपुष्टात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.