गडहिंग्लज : प्राचार्य डॉ.एस. एम. कदम व संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के .
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत निमशहरी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.एस. एम. कदम व संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे म्हणाले, महाविद्यालयाने सलग चार वर्षे हा बहुमान पटकाविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणारे महाविद्यालय म्हणून शिवराज महाविद्यालयाने आपलेपण जपले आहे. संस्था अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयात विविध उपक्रमशील व कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. या प्रयत्नांना यश मिळत आहे. महाविद्यालयातील पारंपारिक व व्यावसायिक शिक्षणाचा लाभ या उपविभागातील आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा या उद्देशाने शिवराज महाविद्यालयाचा हा ज्ञानरत पुढे वाटचाल करत आहे. शिवराज महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत ग्रामीण विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले आहेत. शिवाय महाविद्यालयात अधिकाधिक विद्यार्थी शिकावेत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी शिवराज महाविद्यालयाच्या सायन्स विभागाला हा बहुमान मिळाला आहे. हा बहुमान महाविद्यालयाच्या विविध शाखांना मिळावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहून गुणवत्ता शिष्यवृत्तीत अव्वल ठरण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न शिवराज महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.