![]() |
इचलकरंजी :शाहीर विजय जगताप यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाप्रसंगी माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतर मान्यवर. |
इचलकरंजी(प्रतिनिधी): 'शाहिरी कला जोपासत शुरवीर नररत्नांचे पोवाडे सादर करून शाहीर विजय जगताप यांनी नवक्रांतीच घडवली आहे. शाहिरी ही कला आहे. या कलेच्या माध्यमातून शाहीर जगताप यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात शाहिरी कला जिवंत ठेवण्यासाठी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. भविष्यातही हे कार्य असेच चालु राहण्यासाठी त्यांना उदंड, निरामय आयुष्य लाभो' असे प्रतिपादन माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
शाहीर विजय जगताप यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय इ. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या शाहीर विजय जगताप यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी गौरव समितीचे उपाध्यक्ष पुंडलिक जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत तर समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे प्रास्ताविक केले. वैशाली नायकवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रवींद्र ठाकुर यांनी शाहीरी कला जिवंत ठेवण्यासाठी जगताप यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असल्याचे सांगितले. त्यानंतर गौरव समितीच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते 'इचलकरंजी भूषण' पुरस्काराने जगताप यांना सन्मानीत करण्यात आले. याचवेळी कै. राजाराम जगताप यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सावित्री जगताप यांना देण्यात आला. विजय जगताप यांच्या 'विजयश्री' या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि गौरव स्मरणिकेचे प्रकाशन रविंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. अहमद मुजावर यांनी आभार प्रदर्शन केले.
विजय जगताप यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत 'नेहमी माणसं जोडण्याचं कार्य केले आहे आणि मी कुणाचे वाईट करणार नाही आणि माझे वाईट होणार नाही या आत्मविश्वासानं कार्यरत राहिलो. निस्वार्थीपणे केलेल्या कामाची पोहोचपावती म्हणजे हा सत्कार सोहळा असून नेहमी सर्वांची साथ असु द्या' अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार श्रीनिवास पाटील 'यांनी भाटाचा थाट पोटासाठी असतो. मात्र शाहिरी ही कला आहे. या कलेच्या माध्यमातून विजय जगताप यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात शाहिरी कला जिवंत ठेवण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. आयुष्यभर निरपेक्षपणे कार्यरत राहून समाजासाठी झटणार्या कलाकाराचा समाजाकडून होणारा सत्कार वेगळा आनंद देणाराच आहे. त्यांना भविष्यातही अथक समाजकार्य करण्यासाठी उदंड आयुष्य लाभु दे, याच अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार राजीव आवळे, आदित्य पाटील यड्रावकर, तानाजी पोवार, रविंद्र माने, मदन कारंडे, शशांक बावचकर, प्रकाश पाटील, प्रसाद कुलकर्णी, कॉ सदा मलाबादे, सुप्रिया गोंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर रात्री कोल्हापूर, सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील शाहिरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील गीते व पोवाड्यांचा 'ही रात्र शाहिरांची' हा स्फूर्तिदायक कार्यक्रम झाला.