मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तब्बल दहा दिवस चाललेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी सायंकाळी पडदा पडला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. या दोघांनीही राजभवनावर शपथग्रहण केले.
२१ जून रोजी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत रातोरात आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर आसाम मधील गुवाहाटी येथे रवाना झाले. तब्बल दहा दिवस याच ठिकाणी सत्ता नट्याबाबतच्या हालचाली झाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार गोव्यात दाखल झाले. दहा दिवसानंतर गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते थेट भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी दिवसभर चर्चा रंगली. मात्र सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असे सांगून राजकीय बॉम्ब फोडला. त्यामुळे राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला. हे सांगतानाच त्यांनी आपण मंत्रिमंडळाबाहेर असणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक राजभवनावर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे शपथबद्ध झाल्याने सर्वांच्याच भुवया पुन्हा उंचावल्या. भाजपच्या हाय कमांडकडून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी सांगितल्याचे बोलले जाते. एकंदरीत या सर्व घडामोडी गोपनीय ठेवून करण्यात आल्याने सत्तानाट्याला एक वेगळा रंग आला. तब्बल दहा दिवसापासून सुरू असलेल्या या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी सायंकाळी पडदा पडला. आज दिवसभर एका पाठोपाठ एक राजकीय धक्कातंत्र पाहाव्यास मिळाले.