🔘 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते 'तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा २०२२' चा प्रारंभ
🔘 जनजागृती, रॅली, शालेय स्तरावर स्पर्धांसारखे उपक्रम विविध प्रशासन स्तरांवर राबविण्यात येणार
नवी दिल्ली (सौजन्य :पीआयबी) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज मणिपूरचे आरोग्य मंत्री डॉ. सपम रंजन सिंग यांच्या उपस्थितीत तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा (आयडीसीएफ)-२०२२ चा शुभारंभ केला. हा कार्यक्रम २७ जून पर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी बोलताना राज्यमंत्री डॉ.पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे देशातल्या बालमृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. हा दर २०१४ मधील प्रति १००० बालकांमागे ४५ वरून २०१९ मध्ये प्रति १००० बालकांमागे ३५ इतका कमी झाला आहे. मात्र अजूनही पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमागे अतिसार संबंधित रोग हे एक मोठे कारण असल्याचे ते म्हणाले.
'डिहायड्रेशन' हे मुलांमध्ये अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. तसेच स्तनपान करणाऱ्या मातेच्या आहारातील बदलामुळे बाळाच्या आहारातील बदल हे ही कारण आहे. याशिवाय स्तनदा मातेला किंवा बाळाला प्रतिजैविकांचे सेवन करावे लागल्यास तसेच कोणत्याही प्रकारचे जिवाणू किंवा परजीवी संसर्ग हे अतिसाराचे कारण असू शकते,असे देखील राज्यमंत्री डॉ .पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या ताज्या अहवालानुसार अतिसार झालेल्या पाच वर्षांखालील ६०.६ टक्के मुलांना ओआरएस आणि फक्त ३०.५ टक्के मुलांना झिंक देण्यात आले. याचा अर्थ मातांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण किमान पातळीवर आणण्यासाठी अधिकाधिक जनजागृती मोहिमांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी २०१४ पासून तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारा अतिसाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत हा पंधरवडा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध प्रशासन स्तरांवर जनजागृती, रॅली , शालेय स्तरावर स्पर्धा, नेत्यांकडून राज्य आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम लाभदायी ठरेल, असे त्या म्हणाल्या. शुद्ध पेय जलाचे सेवन, स्तनपान किंवा योग्य पोषणयुक्त आहार, स्वच्छता आणि हात धुण्यासारख्या स्वच्छतेच्या सवयी अतिसाराला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे राज्यमंत्री डॉ पवार यांनी यावेळी सांगितले.स्वच्छ भारत मिशनसारख्या उपक्रमातूनही यावर भर देण्यात आला आहे. यामुळे बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला लक्षणीय मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम असा राबविण्यात येतो
आशा कार्यकर्त्या, परिचारिका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यकर्ते हे आघाडीवरचे आरोग्य कर्मचारी पाच वर्षांखालील बालके असलेल्या कुटुंबांच्या घरी भेट देतात आणि अतिसाराच्या बाबतीत झिंक आणि ओआरएसच्या सेवनाच्या महत्वाविषयी समुपदेशन करतात. याशिवाय ते स्वच्छतेच्या सवयी आणि स्तनपानाविषयी मातांना प्रोत्साहन देतात आणि मातांच्या गट बैठकांमध्ये ओआरएस तयार करण्याच्या पद्धतीबद्दल सल्ला देतात.