इंगळी (ता.हातकणंगले) : येथील काव्य महोत्सवात ग्रंथांचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांच्यासह इतर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): इसवी सनानंतरच्या दोन हजार वर्षांमध्ये मानवी समाजाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त साहित्य निर्मिती करण्यामध्ये विशेषतः वारकरी पंथातील संत साहित्यामध्ये जसे महिलांचे योगदान अमान्य करता येत नाही तसेच प्राचीन काळात देखील महिलांनी लेखक घडविण्यासाठी दिलेले योगदान पुढच्या पिढीसमोर अधोरेखित झाले पाहिजे असे विचार ज्येष्ठ साहित्यिक 'सीतायणकार' प्रा. किसनराव कुराडे यांनी व्यक्त केले. या संदर्भात स्पष्टीकरण देत असताना रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची पत्नी व माता, बसवेश्वर यांची माता व पत्नी, भगवतगीताकार श्रीकृष्णाची माता, बायबल लिहिणार्या येशू ख्रिस्तांच्या जन्मदात्री, कुराणशरीफ लिहिणाऱ्या हजरत पैगंबर यांची पत्नी अशा काही पुराण काळातील पुराव्यासह महिलांचा उल्लेख त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात केले.
हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय यांच्या वतीने आयोजित मिरग नक्षत्र काव्य महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.कुराडे बोलत होते. सुप्रसिद्ध गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनामध्ये साहित्यिक डॉ. रामचंद्र चोथे, प्रा.डॉ.सुरेश कुराडे, बाबा जाधव, मनोहर भोसले, चंद्रकांत निकाडे, आरती लाटणे, डॉ.लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा, मधुकर हुजरे, उस्मानाबाद, बा.ह. मगदूम,पुणे, कवी अशोक पोवार कडेगाव यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी कवियत्री यांनी आपल्या काव्य रचना सादर केल्या. तसेच कार्यक्रमात कवी सरकार यांचा नांगरणी, आरती लाटणे यांनी लिहिलेल्या संत साहित्यातील स्त्रियांचे योगदान, डॉ. रामचंद्र चोथे यांनी लिहिलेल्या खिद्रापूरची मंदिरे:भारतीयांची प्राचीन ठेव, बाबा जाधव संपादित मिरग नक्षत्र या चार ग्रंथांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कवी सरकार यांच्या आभार प्रदर्शनाने या दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.