हरयाणा : खेळाडूंचे गौरव करताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
🎯 एकूण १३७ पदकांसह (५२ सुवर्ण) यजमान हरयाणा गुण तालिकेत अव्वल स्थानावर.
🎯 महाराष्ट्र द्वितीय स्थानी (१२५ पदके - ४५ सुवर्ण)
🎯 कर्नाटक तृतीय स्थानी (६७ पदके - २२ सुवर्ण)
••••••••••••••पंतप्रधानांकडून कौतुक•••••••••••
खेलो इंडिया युवा स्पर्धेने एक भारत श्रेष्ठ भारत मंत्राला अधिक सामर्थ्य दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले विशेष पत्र
खेलो इंडिया युवा स्पर्धांमधून खेळाडूंची पुढील पिढी उदयास येत आहे : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर
हरयाणामध्ये इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेची यशस्वी सांगता
नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी) : हरयाणामध्ये इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर पार पडलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत हरयाणा अव्वल , महाराष्ट्र द्वितीय तर कर्नाटकने तृृतीय स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राने द्वितीय स्थानाचे यश मिळवत आपली वेगळी चमक दाखविली असून या स्पर्धेत महाराष्ट्राने १२५ पदके मिळविली असून ४५ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण १३७ पदकांसह (५२ सुवर्ण) यजमान हरयाणा गुणतालिकेत अव्वल स्थानावर तर कर्नाटकने (६७ पदके - २२ सुवर्ण) तृतीय स्थान मिळविले. या स्पर्धेची सोमवारी यशस्वी सांगता झाली.
या सांगता समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यासह हरयाणातील इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
खेलो इंडिया युवा स्पर्धांमधील १७ भारोत्तोलकांची १५ ते २६ जुलै दरम्यान ताश्कंद येथे होणार्या आगामी आशियाई युवा आणि कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा २०२२मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कर्नाटकचा जलतरणपटू अनिश गौडा याने एकूण ६ सुवर्ण पदकांसह खेळांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली. अपेक्षा फर्नांडिस (जलतरण) आणि संयुक्ता काळे (तालबद्ध जिम्नॅस्टिक्स) या महाराष्ट्राच्याद्वयीने प्रत्येकी ५ सुवर्णपदके पटकावली.
या क्रीडास्पर्धांच्या सांगता समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, कित्येक वर्ष देशाच्या प्रतिभावान खेळाडूंनी विविध व्यासपीठांवर अनेक क्रीडाप्रकारात केलेल्या कामगिरीने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. या सर्व खेळाडूंची प्रतिभा आणि कामगिरी हे जागतिक स्तरावर २१ व्या शतकातील भारताच्या सतत वाढणाऱ्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे.आज देशाच्या युवा खेळाडूंच्या आशा-आकांक्षा निर्णय आणि धोरणांचा आधार बनत आहेत. नवीन राष्ट्रीय धोरणात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाविषयक आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयाने देशात उच्च क्रीडा संस्कृती आकार घेत आहे. क्रीडाक्षेत्रात अंगभूत गुण ओळखून, प्रतिभा आणि नैपुण्याच्या जोरावर निवड आणि प्रशिक्षणापासून खेळाडूंच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार देशातील प्रतिभावान तरुणांच्या पाठीशी आहे. देशाच्या प्रत्येक भागातल्या युवा खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि एक भारत श्रेष्ठ भारत मंत्राला अधिक सामर्थ्य प्रदान केले. युवावर्गाने खेळाच्या मैदानात त्यांच्यातील जोश द्विगुणित करून देशाचा सन्मान आणि आदर अधिकाधिक उंचीवर न्यावा अशी आमची इच्छा आहे.
यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, खेलो इंडिया युवा स्पर्धांच्या प्रत्येक आवृत्तीत हरयाणा आणि महाराष्ट्र यांच्यात चुरशीची लढत होती आणि यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती.हरयाणाने पुन्हा सर्वोच्च सन्मान मिळवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतातील क्रीडा महासत्ता राज्य म्हणून हरयाणाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.प्रो कबड्डीतील स्काउट्सची उपस्थिती ही युवा क्रीडा स्पर्धामध्ये स्वागतार्ह बाब होती.हे हिरे शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देण्यासाठी पैलू पाडण्याकरिता हे स्काउट्स प्रत्येक मॅचच्या वेळी क्रीडांगणात उपस्थित होते. कबड्डीपटूंची पुढची पिढी या खेळातून उदयास येईल असे ते म्हणाले.या क्रीडास्पर्धांमध्ये घडलेल्या काही यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रसंगांचा केंद्रीय मंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.