मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रात भाजपला तीन तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. विजयी उमेदवारांमध्ये भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान आक्षेप नोंदवल्याने मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत रखडली होती. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेल्याने मतमोजणी जवळपास दहा तास थांबली होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री पावणे बाराच्या सुमारास निर्णय दिल्याने मतमोजणी सुरू झाली. पहाटे सव्वा चारच्या आसपास अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. निकालासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वांची उत्सुकता शिगेला लागली होती.