हसुरचंपू : समाजातील विधवांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची शपथ घेताना महिला.
यावेळी गावातील महिला एकत्र येत विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य, सण, समारंभामध्ये मान सन्मान देण्याबाबत एकमताने मंजुरी दिली. राजमाता ग्रामसंघ, विश्वास ग्रामसंघ, श्री.नंदाई महिला मंडळ व संजीवनी फाउंडेशन यांच्या पुढाकाराने गावातील महिलांना एकत्र करण्यात आले. या बैठकीत विधवा प्रथा बंद करण्याविषयी समुपदेशन करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती डॉ. जयश्री तेली मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, हळद,कुंकू, गंध,टिकली, बांगड्या हे सौभाग्यालंकार स्त्रिया जन्मापासून वापरत असतात मग पती गेल्यानंतर का काढायचे. मंगळसूत्र हे नवरा-बायकोच्या नात्याचं, प्रेमाचं प्रतीक आहे. विधवा स्त्री सुद्धा गेलेल्या नवऱ्याचे नाव लावते मग त्याच्या नावाचे मंगळसूत्र का काढायचे असा प्रश्न उपस्थित करून महिलांचे समुपदेशन केले. यावेळी अनेक विधवा स्त्रियांनी सुद्धा चर्चेत सहभाग घेतला. त्यांचे अनुभव सांगितले.
यावेळी मयुरी हजारे, मनिषा तेली, अनिता तेली,शुभांगी फुटाणे, तेजस्विनी शेंडगे,अरुणा फुटाणे, चिटणीस, पद्मा तोडकर, पद्मिनी कांबळे, रेखा खवणे, त्रिवेणी मस्ती, कविता मस्ती, अंजली तेली, विद्या बिरंजे, संगीता नांगनुरे, सोनव्वा फुटाणे, कमल तोडकर यांच्यासह इतर महिलांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेनंतर महिलांनी एकमुखाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. समाजातील विधवा स्त्रियांना सामाजिक, धार्मिक व सण समारंभामध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट करून घेण्याविषयी शपथही घेण्यात आली. हसुरचंपू येथील महिलांनी घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत होत आहे.
![]() |
हसुरचंपू : येथील बैठकीत सहभागी महिला. |