गडहिंग्लज(प्रतिनिधी): मागील वर्षी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तेरणी येथील आप्पासाहेब सिद्धाप्पा हालबागोळ यांच्या तीनही मुलांना डॉ.रियाजभाई शमनजी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
कर्त्या पुरुषाचे अचानक निधन झाल्याने या धनगर कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. याची माहिती शिवसेनेचे डॉ.रियाजभाई शमनजी यांना कार्यकर्त्यांकडून मिळताच त्यांनी तातडीने मयत आप्पासाहेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. यादरम्यान आप्पासाहेब यांच्या कुटुंबीयांची हालाखीची परिस्थिती त्यांच्या लक्षात येताच व तिन्ही मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी शमनजी ग्रुप आप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.
या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षासाठी तिनही मुलांना लागणारी शैक्षणिक साहित्य डॉ. शमनजी यांच्याकडून पाठवून देण्यात आले. हे साहित्य संस्थेचे सचिव लक्ष्मण कंग्राळकर, तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला, कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम.डी. माळी, ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, अंजना निंबाळकर यांच्या उपस्थितीत मुलांना देण्यात आले. यावेळी गीता फडके, संतोष इंगवले, शांता मगदूम, राजू फडके, कल्लाप्पा मगदूम यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.