Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई राजभवनातील 'क्रांती गाथा' दालनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

 


मुंबई (सौजन्य :पीआयबी):
  मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता उपस्थित होते.

२०१६ मध्ये राजभवनाच्या खाली सापडलेल्या ब्रिटीशकालीन भूमिगत बंकरमध्ये देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले आहे. 

नागपूरच्या दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने इतिहासकार आणि लेखक डॉ. विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांचे स्मरण या दालनात केले गेले आहे. १८५७ मधील पहिला स्वातंत्र्यसंग्राम ते १९४६ मध्ये मुंबईत झालेला नौदलाचा उठाव या कालावधीचा आढावा या दालनात आहे. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतीगुरु लहुजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, राजगुरू, मॅडम भिकाजी कामा यांची कहाणी ठळकपणे अनुभवायला मिळते.

तेव्हा बॉम्बे स्टेटचा भाग असलेल्या महाराष्ट्रातून ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या सशस्त्र लढ्याची कहाणी येथे शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे आणि भित्तिचित्रांद्वारे दाखविली आहे.पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना 'अभिनव भारत' आणि प्रति सरकार स्वराज्य १९४० च्या सातारा-सांगली विभागातील हालचाली देखील गॅलरीत टिपल्या आहेत. शाळकरी मुलांनी रेखाटलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची सचित्र उपयुक्त माहिती देखील या दालनात समाविष्ट केली आहे.

राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी अभिलेखागार आणि सावरकर संग्रहालय यांच्याकडून माहिती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य या सभागृहात रेखाटलेले आहे.२०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एन विद्यासागर राव यांना राजभवन येथील हे बंकर सापडले. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधलेले हे बंकर ब्रिटीश शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरत होते. बंकरमध्ये विविध आकाराच्या १३ खोल्या आहेत . त्यामध्ये 'शेल स्टोअर', 'गन शेल', काडतूस स्टोअर, शेल लिफ्ट, सेंट्रल आर्टिलरी रूम, कार्यशाळा असे वेगवेगळे सेल होते. बंकरमध्ये पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था होती तसेच स्वच्छ हवा आणि नैसर्गिक प्रकाशही तिथे येत होता. बंकरमध्ये ठिकठिकाणी दीपमाळा ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून सर्व मूळ वैशिष्ट्यांचे जतन करून हे बंकर काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आले आहे.

१८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तव संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले. १३ खोल्यांच्या बंकरमधील अनेक खोल्या रिकाम्या होत्या. यापैकी अनेक दालनातील खोल्या तसेच भिंतीचा वापर आता क्रांती गाथा - गॅलरी साठी केला गेला आहे. या क्रांती गाथा दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यामुळे क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.