![]() |
देहु : संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण प्रसंगी वारकऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. |
पुणे (सौजन्य : पीआयबी): संत तुकाराम महाराज यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम महाराज यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.
विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम महाराज यांनी ज्या शिळेवर बसून १३ दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.
या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले. संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांचे आदर्श अनेक लोकांना प्रेरणा देतात आणि आपल्याला इतरांची सेवा करण्यासाठी तसेच दयाभावाने भरलेल्या समाजाची जोपासना करण्यासाठी प्रेरित करतात.
१७ व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम महाराज त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्यांच्या साहित्यकृतींनी मध्यवर्ती स्थान मिळविलेले आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू हे या संतकवीचे जन्मस्थान आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग यांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पायाभूत सुविधांच्या अद्यायावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. पंढरपूरच्या यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांना या रस्त्यांवरून सुलभपणे मार्गक्रमण करता यावे या उद्देशाने महामार्गाच्या लगत समर्पित पदपथ बांधण्यात येत आहेत.