Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरासह तालुक्यात महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

गडहिंग्लज : वटपौर्णिमेनिमित्त येथील नदीवेस भागात वडाच्या झाडाला धागा बांधून व्रत करताना महिला.                                               (छाया : मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज शहरासह तालुक्यात महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मोठ्या भक्तिभावाने उपवास करत महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली.

 ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. वटपौर्णिमा निमित्त महिलांनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा केली. वडाच्या झाडाला धागा बांधून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली. गडहिंग्लज शहरासह तालुक्यात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली.


वटपौर्णिमा दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करतात?
वाचा ह्या मागील सांगितली जाणारी कथा

भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती.  सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली. त्यामुळे सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे  राणी व मुलासहित हा राजा जंगलात राहत होता. सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे  भगवान नारदाला माहित होते त्यामुळे त्यांनी सावित्रीला त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला दिला होता. मात्र सावित्रीने ते अमान्य करत  सत्यवानाशीच विवाह करून जंगलात येऊन ती आपल्या नवऱ्याबरोबर राहत सासू व सासऱ्याची सेवा करू लागली.सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत केले. जेव्हा सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला तेव्हा सावित्रीही त्याच्या बरोबर गेली. 

लाकडे तोडत असताना सत्यवानाला चक्कर आल्याने तो जमिनीवर पडला. तितक्यात यमराज तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. मात्र सावित्रीने  पतीबरोबर जाण्याचा हट्ट सोडला नाही. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गडबडीत तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. असे वटपौर्णिमा साजरी करण्यामागील ही कथा सांगितली जाते.

    (छाया : मज्जिद किल्लेदार)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.