🔘केंद्राच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल जिल्हा,शहर प्रशासनाला दिली शाबासकी
🔘केंद्रीय योजनांच्या कोल्हापुरातील लाभार्थ्यांशी साधला संवाद
🔘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेद्वारे महिलांनी उभ्या केलेल्या गुळ उत्पादन व मसाले उत्पादनाची ऐकली यशोगाथा
🔘कोल्हापूरच्या प्रशासनाने उद्दिष्टांपेक्षा वरचढ कामगिरी करून दाखवून प्रशंसा मिळविल्याचे काढले उदगार
![]() |
कोल्हापूर : येथे केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश. |
कोल्हापूर:(सौजन्य: पीआयबी): केंद्रीय वस्त्रोद्योग तथा रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्राच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, गेल्या आठ वर्षात केवळ योजनांच्या प्रसिद्धीवर लक्ष न देता त्याची अंमलबजावणी कशी होत आहे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने लक्ष घालत आहेत. याचे उदाहरण द्यावयाचे म्हटले तर,काही दिवसापूर्वी हिमाचल प्रदेश मधील सोलन येथून पंतप्रधानांनी देशभरातील लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादात दिसून आले. राज्यमंत्री पुढे म्हणाल्या,गेल्या आठ वर्षात स्वच्छ भारत अभियान यासारख्या कित्येक योजना यशस्वीपणे राबवून त्यांचा पुढील टप्पा देखील सुरू करण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरण यांसारख्या योजनांद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तसेच उज्वला आणि उजाला यांसारख्या योजनांचे लाभ लाभार्थ्याच्या खात्यात थेटपणे पोचवण्यात आले.
केंद्राच्या विविध योजना चांगल्या पद्धतीने व यशस्वीपणे राबविल्याबद्दल कोल्हापूरच्या प्रशासनाचे कौतुक करताना राज्यमंत्री म्हणाल्या,केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवण्यात कोल्हापूर जिल्हा तसेच शहर प्रशासन उत्तम कार्य कामगिरी करत आहे. अमृत सरोवर सारखी योजना असो अथवा स्वनिधी सारखी योजना असो येथील प्रशासनाने उद्दिष्टांपेक्षा वरचढ कामगिरी करून दाखवून प्रशंसा मिळवली आहे, असे कौतुक त्यांनी केले
यावेळी श्री तिरुमल महिला स्वयंसहायता समूह चालवणाऱ्या मंजुषा मानकापूरे यांनी मंत्र्यांशी संवाद साधला. मानकापूरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेद्वारे दिवसाला एक हजार किलोचे उत्पादन करून दहा सदस्यांव्यतिरिक्त इतर २३ जणांना काम मिळवून दिले आहे. हंगामाच्या काळात प्रति महिना जवळपास अकरा लाख रुपयांची उलाढाल करून हा समूह थेट व्यापाऱ्यांना गुळ विकतो आणि नफा कमावतो असे सांगत या उद्योगातील यशोगाथा सांगितली.
तसेच लाभार्थी सरिता करंबेळकर यांनीदेखील या योजनेद्वारे मिळालेल्या ९,९०,००० रुपयांच्या मदतीतून साक्षीज् रसोई मसाले हा उद्योग कसा उभा केला त्याची माहिती दिली. एकूण पाच महिला कार्यरत असलेला या उद्योगात १६ प्रकारचे मसाले तयार केले जातात आणि सोनपरी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्याची विक्री होते. अशी माहिती त्यांनी राज्यमंत्र्यांना दिली.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, केंद्राच्या अनेक योजना जिल्ह्यात चांगल्याप्रकारे राबविण्यात येत आहेत, असे सांगून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.
कसबा बावड्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कसबा बावडा येथील ७६एमएलडी क्षमता असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली.त्यानंतर मंत्र्यांनी पुईखडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधला.
![]() |
कोल्हापूर : येथे भेटीप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश, यावेळी उपस्थित खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे व इतर. |