बसर्गे : येथे यंत्राच्या सहायाने सोयाबीन पेरणी करताना प्रगतिशील शेतकरी राजू टोणपी.
हलकर्णी ( सुनील भुईंबर ): गडहिंग्लज तालुक्याचा पूर्व भाग म्हणजे प्रगतिशील शेतकऱ्यांचे माहेरघर होय. हलकर्णी परिसरात सोयाबीन , भुईमूग , ज्वारी , भात पेरणीची धांदल सुरु आहे. अनियमित पावसामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचेही वातावरण दिसत आहे.
गतवर्षी पावसाची सुरुवात एक महिना अगोदर झाली होती, मात्र यंदा शेतकऱ्यांना मान्सून ची प्रतीक्षा करावी लागली. ऐन हंगामात पावसाने निमित्त दाखविल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. बदलत्या जीवनशैलीत या परिसरातील शेतकरी यांत्रिक पद्धतीने आधुनिक शेती करण्यात माहीर आहेत. सध्या ह्या भागातील शेतकरी पेरणी यंत्राच्या सहायाने सोयाबीन पेरणी करण्यात व्यस्त आहेत. येथे दरवर्षीच पेरणीचा पहिला हंगाम उरकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते.
गागावात बैलजोड्या कमी प्रमाणात आहेत, त्याशिवाय कमी वेळेत जास्त क्षेत्रावर शास्त्रोक्त पद्धतीने पेरणी करण्याकरीता शेतकरी यंदाच्या पेरणीला अधिक पसंती देत आहेत. यंत्राच्या सहायाने पेरणी करण्याकरीता सीमा भागातील काही यंत्र मालक या परिसरात तळ ठोकून आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाचल्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.